Nanded News : पैनगंगा नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

Nanded News: पैनगंगा नदीपात्रातून वाळूचा अवैध उपसा

सारखणी : पैनगंगा नदी पात्रातून अवैधरित्या वाळूचा उपसा मागील दोन महिन्यापासून सुरू असून याकडे महसूल प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. वाळू माफिया रात्रीच्या अंधारात वाळूची तस्करी करून जवळच्या गावाशेजारी वाळूची ठिकठिकाणी साठेबाजी करून विक्रीस उपलब्ध करत आहेत. साठेबाजी करून ठेवलेल्या ठिकाणी तहसीलदार आणि महसूल प्रशासनाने छापे मारून कारवाई करावी त्याचबरोबर नदी घाटाचे लिलावही लवकर करण्याची मागणी होत आहे.

किनवट तालुक्यातील रामपूर, भामपुर, पाथरी, शिख धानोरा, खंबाळा येथील वाळू घाटाचा लिलाव झाला नाही. मात्र, तरीसुद्धा या भागात सर्रास वाळू उपसा होत आहे. पैनगंगा नदी पात्रातून वाळू काढून जवळच्या गावाशेजारी साठे करण्यात येत आहेत.

त्यामुळे अशांचा शोध घेऊन कार्यवाही करण्याचे आव्हान महसुल विभागाच्या समोर आहे. अधिकाऱ्यांकडून आता साठेबाजी करणाऱ्यांवर काय कार्यवाही होणार? याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.

पैनगंगा नदीतून वाळूचे रात्री बे रात्री उत्खनन करून छुप्या मार्गाच्या साठवणूक करून नंतर हीच वाळू चोरीच्या मार्गाने विक्री होत आहे. पाथरी शिवारातही वाळूचे साठे असून याची तपासणी महसूलच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून कार्यवाही करावी, अशी मागणी नागरिकातून करण्यात येत आहे. महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन कारवाई करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.