
नांदेड : लॉटरी चे अमिष दाखवून लाखोंची फसवणूक
हिमायतनगर : शहरातील शंकरनगर भागातील एका नागरिकास तुम्हाला लॉटरीवर स्कुटी आणि सोने लागले आहे, असे आमिष दाखवून दीड लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. हिमायतनगर शहरातील शंकरनगर भागात मजुरदार विष्णू राजाराम उत्तरवार हे शहरासह ग्रामीण भागात मुरमुरे विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. सकाळी बारा वाजेपर्यंत व्यवसाय करून आल्यानंतर घरी बसले असता अज्ञात व्यक्ती घरी आला. तुम्हाला लॉटरीवर स्कुटी आणि सोन्याचे बक्षीस लागले असल्याचे त्याने अमिष दाखविले.
त्यासाठी तुम्हाला तुमच्याकडील सोने द्यावे लागेल, असे म्हणून भुरळ पाडली. तुमच्याकडील सोने द्या, सोनाराकडे वजन करून परत देतो, अशी बतावणी केली. यावर विश्वास बसत नसल्याने उत्तरवार यांनी मी माझ्या मुलास विचारून तुमच्याकडे सोने व मोबाईल देतो, असे म्हटल्यानंतर त्या व्यक्तीने तुम्ही चला मुलाला विचारू म्हणून सोबत सोने व मोबाईल घेण्यास सांगितले.
त्या व्यक्तीने त्याच्या दुचाकीवरून रस्त्याने नेत असतानाच राज लाईट्स या दुकानाच्या बाजूला गाडी थांबवून गाडीवरून उतरविले. त्यांच्या जवळ खिशात असलेले सोने, मोबाईल घेऊन सोनाराकडे जाऊन याची पावती आणतो, असे म्हणून दिशाभूल करून ८९ हजाराचे गंठण आणि ५४ हजार किंमतीचे सोन्याचे वेड तसेच १४ हजाराचा मोबाईल असा एकूण एक लाख ५७ हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला.
याबाबत विष्णू उत्तरवार यांनी दिल्यावरून हिमायतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली बिट जमादार अशोक सिंगणवाड करत आहेत. दरम्यान, आरोपी ज्या दिशेने दुचाकीवरून गेला. त्या भागाचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले असून पोलीस त्या दिशेने तपास करीत आहेत. दिवसा ढवळ्या नागरिकांची अशा प्रकारे फसवणूक करून सोन्याचे दागिने लंपास झाले आहेत. या घटनेमुळे भीती निर्माण झाली असून, पोलिसांनी या घटनेचा तपास करून पुन्हा शहरात अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Web Title: Nanded People Lottery Fraud Jewelery Stolen Himayatnagar Police Filed Case
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..