नांदेड : दरोडेखोरांच्या म्होरक्याकडून पिस्तूल, खंजर व दोन दुचाकी जप्त- सुनिल निकाळजे

प्रल्हाद कांबळे
Monday, 16 November 2020

मुदखेड पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी केला. टोळीच्या म्होरक्यासह त्याच्या साथीदाराला अटक करुन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली देशी बनावटीचे पिस्तूल, खंजर व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणातील सहा आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

नांदेड : मुदखेड, भोकर आणि अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सराफा व्यापाऱ्यांना पिस्तुलचा धाक दाखवून, वेळप्रसंगी खंजीरने जबर मारहाण करुन लूटमार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मुदखेड पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी केला. टोळीच्या म्होरक्यासह त्याच्या साथीदाराला अटक करुन त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली देशी बनावटीचे पिस्तूल, खंजर व दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. या प्रकरणातील सहा आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.

मुदखेड शहरात ता. ३१ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास सराफा व्यापारी राघवेंद्र पबितवार यांच्यावर प्राणघातक हल्ला करुन त्यांना लुटण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांच्यावर रोखुन धरलेल्या पिस्तुलातील मॅक्झिम खाली गळून पडल्याने मोठा अनर्थ टळला होता. या प्रकरणात मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर पोलिस यंत्रणाही सज्ज झाली होती.

हेही वाचानांदेड : जिल्ह्यात आगीच्या तीन घटना, लाखोंचे नुकसान -

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचे होते लक्ष 

पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत तपासाची चक्रे वेगाने फिरवत या गुन्ह्यातील आरोपींना अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश भाले, पोलिस हवालदार किरण तेलंगे, केशव पांचाळ, चंद्रशेखर मुंडे, विजय आले वार, रवी लोहाळे, नरेंद्र ढाले, बालाजी कदम, शेख मकसूद, माधव पवार, मनोज राठोड, विनायक मठपती, श्री. बोईनवाड आणि पठाण यांनी वरिष्ठांच्या सूचनांनुसार या आरोपींना अटक केली.

येथे क्लिक करा - नांदेड : रायवाडीची स्मशानभूमी पर्यटनस्थळासारखी, लोकसहभागातून रुपडे पालटले -

टोळीचा म्होरक्या किशन पवार जेरबंद

ता. आठ नोव्हेंबर रोजी लक्ष्मण उर्फ लकी बालाजी मोरे राहणार सन्मित्र कॉलनी मुदखेड आणि दीपक तारासिंग ठाकूर राहणार चिरागगल्ली, इतवारा नांदेड यांना ताब्यात घेतले. त्यानंतर या आरोपींनी अन्य साथीदारांची नावे सांगून भोकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिठा येथील व्यापारी राजकुमार शहाणे यांचीही लूटमार केली होती. त्या गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर अर्धापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या आसना नदीवर नंदकुमार लोलगे यांची ही सोन्याच्या दागिण्याची बॅग लंपास केली होती. या गुन्ह्याचीही कबुली त्यांनी पोलिसांना दिली. यानंतर मुदखेड पोलिसांनी हनुमान कोंडीबा पलेवाड राहणार सन्मित्र कॉलनी मुदखेड. विश्वजीत दिगंबर गिरी बापूसाहेब नगर मुदखेड. संतोष उर्फ सुरज देविदास शंकर दगडपल्ले राहणार हिंगोली नाका गोविंद नगर नांदेड आणि किशन मारुती पवार राहणार निवघा तालुका मुदखेड यांना अटक केली. यातील मुख्य आरोपी किशन पवार याचकडून शेतात लपून ठेवलेले देशी बनावटीचे पिस्तूल, खंजर आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत, या टोळीकडून जिल्ह्यातील चोरी घरफोडी सारखे गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिस निरीक्षक सुनील निकाळजे यांनी व्यक्त केली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Pistol, dagger and two two-wheelers seized from robbers Sunil Nikalje nanded news