
नांदेड : पावसाचे पाणी मुरण्यासाठी नियोजन आवश्यक
नांदेड : नांदेड शहरात सध्या मुख्य रस्ते व अंतर्गत प्रभागातील रस्त्यांच्या निर्मितीची कामे मोठ्या प्रमाणावर होत आहेत. या रस्त्यांच्या निर्मितीमध्ये वृक्ष लागवड व पावसाचे पाणी मुरण्यासाठी ठराविक अंतरावर जागा सोडणे किंवा सिमेंटचे रिंग टाकणे अशा प्रकारचे नियोजन आवश्यक आहे, असे निवेदन वृक्षमित्र फाऊंडेशनतर्फे महापौर जयश्री निलेश पावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे यांना गुरुवारी देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील सध्याचे वाढलेले तापमान तथा पाण्याचे दुर्भिक्ष्य लक्षात घेता येणाऱ्या पावसाळ्यात पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यासाठी तसेच पर्यावरण रक्षणासाठी रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीबाबत नियोजन करणे अत्यावश्यक आहे. यामुळे भविष्यात येणाऱ्या संकटावर तर उपाय होईलच सोबतच शहर सोंदर्यीकरण होऊन नांदेड शहराची पर्यावरणपूरक शहर म्हणून ओळख निर्माण होऊ शकेल.
नांदेड जिल्ह्यात वृक्षमित्र फाऊंडेशन मागील पाच वर्षांपासून महापालिकेच्या सहकार्याने हरित शहरासाठी विविध उपक्रम यशस्वीरित्या राबविले आहेत. स्वच्छ, सुंदर व पर्यावरणपूरक शहराच्या नियोजनात रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड व जलसंधारणाबाबत महापालिकेने त्वरीत कार्यवाही करावी.
तसेच शहरातील सर्व नागरिकांनी देखील आपआपल्या प्रभागात किंवा मुख्य रस्त्यावर वृक्षांसाठी जागा सोडावी यासाठी नगरसेवक, कंत्राटदार, अभियंता यांच्याकडे याबाबतीत आग्रह करावा, या आशयाचे निवेदन वृक्षमित्र फाउंडेशनचे संतोष मुगटकर, डॉ. परमेश्वर पौळ, सतीश कुलकर्णी, शैलेंद्र क्षीरसागर, गणेश साखरे आदींनी महापौर व अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन दिले.
यावेळी महापौर जयश्री पावडे यांनी याबाबत सकारात्मक पावले उचलली जातील व जिथे महापालिकेच्या वतीने निर्मिती होत असलेल्या रस्त्यांवर या बाबतीत संबंधिताना सूचना दिल्या जातील, असे आश्वासन दिले. तसेच अधीक्षक अभियंता धोंडगे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होणाऱ्या रस्त्यांवर वरील दोन्ही बाबींची पूर्तता करण्यासाठी योग्य नियोजन केले असल्याची माहिती वृक्षमित्रांना दिली. तसेच शहरातील पर्यावरण प्रेमी नागरिक व संघटनांशी संवाद साधून त्यांच्या सूचना व मार्गदर्शनाचे स्वागत केले जाईल, असे आश्वासनही श्री. धोंडगे यांनी दिले.
Web Title: Nanded Planning To Rain Water Harvesting Vrikshmitra Foundation
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..