Nanded : सेवानिवृत्तीधारकांसाठी पोस्टाचा अभिनव उपक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded

Nanded : सेवानिवृत्तीधारकांसाठी पोस्टाचा अभिनव उपक्रम

नांदेड : शासनाच्या विविध सुविधा आणि सेवानिवृत्तीधारकांना घरपोच हयातीचे प्रमाणपत्र मिळावे, यासाठी निवृत्तीवेतन भारतीय डाक विभागाच्या वतीने ‘नो टेन्शन, फॉर पेन्शन’ हा अभिनव कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. तसेच दरवर्षी डिसेंबरपूर्वी हयातीचे प्रमाणपत्र सेवानिवृत्तीधारकांना सादर करावे लागते. त्यासाठी त्यांना नाहक त्रास होत होता. परंतु आता हे प्रमाणपत्र पोस्टमनकडून घरपोच किंवा पोस्ट कार्यालयातून मिळवण्याची सुविधा डाक विभागाने उपलब्ध करून दिली आहे.

‘नो टेन्शन, फॉर पेन्शन’ हे ब्रीदवाक्य घेऊन डाक विभागाच्या वतीने हे प्रमाणपत्र घरपोच पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. योजनेनुसार हयातीचे (लाईफ सर्टीफिकेट) प्रमाणपत्र आता पोस्टातून आणि घरपोच सुद्धा उपलब्ध करून देण्यात येत आहे. पोस्टमन हयातीचे प्रमाणपत्र पेन्शनधारकांना घरपोच उपलब्ध करून देणार आहे. डाक विभागाच्या वतीने पेन्शनधारकांना घरपोच हयातीचे प्रमाणपत्र घरपोच पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सेवानिवृत्तीधारकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रमाणपत्रासाठी शुल्क ७० रुपये

हयातीच्या प्रमाणपत्रासाठी सेवानिवृत्तीधारकांना जीएसटीसह ७० रुपये द्यावे लागतात. परंतु इंडिया पोस्ट पेमेंट बॅंकेचे प्रीमियम अकाऊंटधारकांना यात ५० टक्के सूट देण्यात येत असून हे अकाऊंट असल्यास केवळ ३५ रुपये भरून हयातीचे प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात येत आहे.

ही आहेत आवश्यक कागदपत्रे

हयातीचे प्रमाणपत्र मिळविण्यासाठी ज्या बॅंकेतून पेन्शन मिळते त्या बॅंकेचे नाव, आधार कार्ड क्रमांक आणि पेन्शन पेमेंट आॅर्डर या तीन बाबी महत्त्वाच्या आहेत. या तीन बाबींची पूर्तता केल्यास संबंधित व्यक्तील घरपोच हयातीचे प्रमाणपत्र डाक विभागाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात येत आहे.

टॅग्स :Nandedpost