नांदेड : प्रमोद शेवाळे पोलीस अधीक्षकपदी रुजु

प्रल्हाद कांबळे
Sunday, 20 September 2020

ते सध्या ठाणे परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. प्रमोद शेवाळे यांनी रविवारी (ता. २०) रोजी श्री. मगर यांच्याकडून पदभार स्विकारला.

नांदेड : पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर यांची बदली झाल्यानंतर नांदेड पोलिस अधीक्षक पदी प्रमोद शेवाळे यांची नियुक्ती झाली होती. ते सध्या ठाणे परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. प्रमोद शेवाळे यांनी रविवारी (ता. २०) रोजी श्री. मगर यांच्याकडून पदभार स्विकारला. यावेळी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी, ठाणेदार यांची उपस्थिती होती.

राज्याच्या गृहविभागाने काही भापोसे व रापोसे अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. हे आदेश गुरुवारी (ता. १७) रात्री उशिरा निर्गमीत केले. त्यात नांदेडचे पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर यांची बदली करण्यात आली होती. मात्र या बदली आदेशात त्यांना सध्या तरी पदस्थापना दिली नाही. त्यांच्या ठिकाणी उल्हासनगर येथून पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे यांना पाठविण्यात आले. प्रमोद शेवाळे यांनी यापूर्वी राज्याच्या अनेक भागात उत्कृष्ठ सेवा केली आहे.

हेही वाचा -  शेतकऱ्यांनी पिकाच्या नुकसानीची तक्रार 72 तासाच्या आत विमा कंपनीकडे नोंदवावी -
 
गुन्हेगारांचा कर्दनकाळ म्हणून प्रमोद शेवाळेंची ओळख

मुळचे नाशिक जिल्ह्यातील प्रमोद शेवाळे हे १९९६ बॅचचे थेट पोलिस उपाधीक्षक आहेत. ते परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून चंद्रपूर येथे पोलिस सेवेची सुरुवात झाली. त्यानंतर वडसा (जिल्हा गडचिरोली) या उपविभागाचे ते उपविभागीय पोलिस अधिकारी झाले. त्यानंतर मालेगाव, धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे सेवा दिल्यानंतर पदोन्तीनवर त्यांची दौंड राज्य राखीव बल येथे प्राचार्य म्हणून गेले. त्यानंतर अतिरिक्त पोलिस अधीक्षक म्हणून ते धूळे येथे रुजु झाले. त्यावेळी तेथे झालेली दंगल त्यांनी योग्य रित्या हाताळून जिल्हा शांत केला होता. पनवेल (मुंबई) येथे पोलिस उपायुक्त त्यानंतर पुढे अनुसुचीत जाती जमाती विभागाचे ते पोलिस अधीक्षक म्हणून राहिले. राज्य गुप्त वार्तामध्येही त्यांनी काम केले. सध्या ते उल्हासनगर येथे पोलिस उपायुक्त पदी कार्यरत होते. त्यांच्या कामाची दखल घेतल्याने शासनाने त्यांच्यावर संवेदनशिल असलेल्या नांदेड जिल्हयाची जबाबदारी टाकली आहे. गुन्हेगारांचे कर्दनकाळ म्हणून त्यांची ओळख आहे. 

येथे क्लिक करा - Video - नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांची जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी -

विजयकुमार मगर यांचा कार्यकाळ 

नांदेडात गेल्या दोन वर्षापासून रिंदा गॅंगची दहशत होती. व्यापारी, डॉक्टर यासह बड्या उद्योगपतींना जीवे मारण्याची धमकी देऊन लाखो रुपयांची खंडणी वसुल करत होती.तेरा महिन्यापूर्वी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर हे नांदेडला रुजू झाले. यावेळी त्यांच्यासमोर खंडणीखोरांची दहशत शहरात होती. त्यांनी तातडीने पावले उचलत त्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली. आतापर्यंत या टोळीमधील जवळपास ६० हून अधिक गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये एका पोलिस निरीक्षकाचाही समावेश आहे. त्यामुळे नांदेडात त्यानंतर खंडणीसाठी होणाऱ्या गोळीबाराच्या घटनांना लगाम बसला. गणेशोत्सव, रामनवमी, निवडणुका यासह इतर बंदोबस्ताचे जिल्हा पोलीस दलाने यशस्वीरित्या पार पाडले. यासह विविध समाजहिताचे त्यांनी काम केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Pramod Shewale has been appointed as Superintendent of Police nanded news