
पहिल्या वेचणीत कपाशीच्या उलंगवाडीचे संकट दिसून येत असल्याने आष्टा परिसरातील मं पार्डी, बंजारातांडा, आसोली, मेठ, उमरा, हिवळणी, नखेगाव, वडसा, टाकळी, मुरली, लकमापुर, लींबायत, मालवाडा, लांजी, शेकापुर, केरोळी शेतकऱ्यांवर उपट पऱ्हाटी पेर गहू म्हणण्याची वेळ आली आहे.
आष्टा (ता. माहूर) : यावर्षी खरीप हंगामातील विविध पिकांवर रोगराई, सततच्या पावसानंतर कपाशी पिकावर बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे, पहिल्या वेचणीत कपाशीच्या उलंगवाडीचे संकट दिसून येत असल्याने आष्टा परिसरातील मं पार्डी, बंजारातांडा, आसोली, मेठ, उमरा, हिवळणी, नखेगाव, वडसा, टाकळी, मुरली, लकमापुर, लींबायत, मालवाडा, लांजी, शेकापुर, केरोळी शेतकऱ्यांवर उपट पऱ्हाटी पेर गहू म्हणण्याची वेळ आली आहे.
यावर्षी सततच्या पावसामुळे सोयाबीनचे उत्पादन झाले नाही. मुग व उडिदाच्या पिकांचे पावसाने तीन तेरा वाजविल्याने लागलेला खर्चसुद्धा वसूल झाला नाही. शेतकऱ्यांच्या संपूर्ण आशा कपाशीच्या पिकावर केंद्रित झाल्या होत्या. मूग उडीदाच्या पीकांचे झालेले नुकसान कपाशीच्या पिकांच्या माध्यमातून वसूल करण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी उत्पादन वाढीसाठी कपाशीच्या पिकावर वारेमाप खर्च केला. परंतु कपाशीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात बोंडआळीचा प्रदूर्भाव दिसून येत असल्याने कपाशीचे पीक देखील शेतकऱ्यांना पाहिजे तेवढा उत्पादन देणार नाही. अशी बिकट अवस्था शेतकऱ्यावर निर्माण झाली आहे. चांगल्या दिसणाऱ्या कपाशीच्या बोंडामध्ये बोंडआळी दिसून येत असल्याने शेतकऱ्यांनी कपाशीवर केलेला खर्च सुद्धा भरून निघणे कठीण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर पऱ्हाटी उपटून टाकण्याची वेळ आली आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे त्यांचेवर गहू, हरभरा पेरण्याची वेळ आली आहे.
हेही वाचा - कोरोना इफेक्ट : कुंभार व्यवसायीकांवर संकटाचे ढग -
प्रतिक्रिया
यावर्षी कपाशीवर केलेला खर्च देखील विविध संकटामुळे भरून निघणार नसल्याने शेतकरी वर्गाला आर्थिक झळ सोसावी लागणार आहे या आर्थिक संकटात असणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने पिक विम्याच्या माध्यमातून नुकसान भरपाई द्यावी.
- किसन मोरे, शेतकरी लींबायत
सततच्या पावसामुळे आधी पराटीच्या पात्याची नूकसान झाली असून आता बोंडामध्ये रुपांतर झालेल्या बोंडाना आता बोंडअळीचे मोठे संकट आले आहे.पाच एकरमध्ये फक्त १५ क्विंटल कापूस निघाले असून बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव थांबता थांबेना. एका वेचणीतच आठ ते नऊ फुट असलेली पराटी आम्हा शेतकर्यांना उपटून फेकण्याची वेळ आली आहे. तरी माय बाप सरकारने झालेल्या नूकसानीचे भरपाई द्यावी.
- अंबादास राजुरकर, प्रगतशिल शेतकरी वाई बा.
संपादन- प्रल्हाद कांबळे