
Nanded : वीज कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका; बॅटऱ्यांच्या प्रकाशात करावी लागली शस्त्रक्रिया
तामसा (जि. नांदेड) : वीज कंपन्यांतील कर्मचाऱ्यांच्या संपामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांसाठी बुधवारी पेचप्रसंग निर्माण झाला. केंद्राच्या यंत्रणेने त्यावर मात चक्क बॅटऱ्यांच्या प्रकाशावर शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या.
कुटुंब कल्याण शस्त्रक्रियांसाठी केंद्रात मंगळवारी (ता.३ ) १७ महिला दाखल झाल्या होत्या. आज सकाळी शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन होते. मात्र वीज कर्मचाऱ्यांच्या संपामुळे काल मध्यरात्रीपासून तामसा शहराचा वीजपुरवठा खंडित झाल्याने पेच उद्भवला. विजेशिवाय शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते.
वैद्यकीय अधिकारी डॉ. रामदास बोंदरवाड, डॉ. दीपक कदम यांनी शस्त्रक्रियांसाठी पर्यायी उपायांबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे यांच्याकडे संपर्क साधला. महिला व त्यांच्या कुटुंबीयांना विश्वासात घेत. चार बॅटऱ्या उपलब्ध करून त्यांच्या प्रकाशझोतात शस्त्रक्रिया केल्या.