Nanded : कंधार उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kandhar Subdistrict Hospital

जिल्हाधिकाऱ्यांनी कंधार येथील उपजिल्हा रुग्णालयाला दिलेल्या जमिनीबाबत न्यायालयात वाद सुरू असल्याने रुग्णालयाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

Nanded : कंधार उपजिल्हा रुग्णालयाचा प्रश्न मार्गी

२०१८-१९ मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कंधार येथील उपजिल्हा रुग्णालयासाठी बाळांतवाडी शिवारातील कंधार-लोहा रस्त्यावरील शासकीय गायरान गट नंबर १५ मधील १.६ आर जमीन दिली होती. परंतू गायरानधारक संजय कांबळे यांनी याबाबत येथील दिवाणी न्यायाधीश वरीष्ठस्तर यांच्या न्यायालयात दावा दाखल करून जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान दिले. न्यायालयाने तात्पुरता स्टे ही दिला होता. जागेवरचा वाद न्यायालयात गेल्यानंतर आणि स्टे मिळाल्यानंतर उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम रखडले होते.

या रुग्णालयासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी सततचा पाठपुरावा करून सप्टेंबर २०२० मध्ये ३० कोटी ८८ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. निधी उपलब्ध झाल्याने आता कंधारमध्ये उपजिल्हा रुग्णालय बांधले जाणार या बाबत कोणाच्याही मनात शंका नव्हती. परंतू मध्येच जागेचा वाद सुरू झाला. यामुळे जिल्हा रुग्णालयासाठी मंजूर झालेला निधी परत जाऊन कंधार मध्ये उपजिल्हा रुग्णालयाचे स्वप्न, केवळ स्वप्नच राहून जाते की काय अशी स्थिती निर्माण झाली असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी गायरानधारक सोबत चर्चा करून तडजोड घडवून आणली. गायरानधारकाला दुसरीकडे जागा देण्यात आल्याने कंधार-लोहा रस्त्यावर उपजिल्हा रुग्णालयाचा मार्ग मोकळा झाला आहे.

सकाळच्या पाठपुराव्याला यश

कंधार तालुक्यात १२६ गाव वाडी-ताड्यांचा समावेश आहे. विविध भागातून दररोज ग्रामीण रुग्णालयात मोठ्यासंख्येने रुग्ण येतात. परंतू त्यांना योग्यत्या सोई सुविधा उपलब्ध होत नाही. ‘सकाळ’ने उपजिल्हा रुग्णालयाभावी रुग्णाची होणारी हेळसांड, कंधारमध्ये उपजिल्हा रुग्णालयाची गरज यासह जागे अभावी रखडलेले रुग्णालयाचे बांधकाम, निधीची उपलब्धता, प्राप्त निधी परत जाण्याची शक्यता आदी विषय सातत्याने लावून धरले होते. जिल्हा रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न मार्गी लागल्याने ‘सकाळ’चा पाठपुरावा यशस्वी झाला आहे.

टॅग्स :NandedHospitaldoctor