Nanded : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया थांबली ; पण इच्छुकाची तयारी मात्र जोरात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

gram panchayat

Nanded : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया थांबली ; पण इच्छुकाची तयारी मात्र जोरात

तामसा : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची प्रक्रिया थांबली असली तरी इच्छुकांची तयारी मात्र थांबली नसून विविध प्रसंगाने भेटीगाठीवर लक्षवेधी सक्रियता दाखविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. निवडणूक आयोगाने नुकतेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण घोषित केले असून ता. १८ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाचा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक संदर्भाने येणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर याच वर्षी निवडणुकांचा बार उडण्याची शक्यता आहे.

तामसा व आष्टी जिल्हा परिषद गटातील राजकीय पक्षांचे इच्छुक व अपक्ष यांनी संपर्कावर भर देत तयारी वाढविली आहे. तामसा गटाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी राहण्याच्या आशेवर इच्छुकांमध्ये चुरस बघायला मिळत आहे. काँग्रेसकडून इच्छुक विजय कौशल्ये यांनी दोन वर्षापासून निवडणुकीची तयारी चालविली आहे.

या गटात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून पाथरडचे सरपंच भगवानराव पवार-पाथरडकर यांनी मागील चार महिन्यापासून वाढविलेले संपर्क चर्चेत आहेत. ग्रामपंचायत सदस्य सुभाष बास्टेवाड हे सख्या की चुलत भावाला निवडणुकीसाठी पुढे करतात, याची उत्सुकता वाढत आहे.

बाजार समितीचे उपसभापती विशाल परभणकर यांच्या नावाचा आग्रह असला तरी ते निवडणुकीसाठी फारसे इच्छुक नसल्याचे मानले जाते. परिणामी भाजपकडून निवडणुकीच्या आखाड्यात रंगत भरविणारा उमेदवार उतरण्याची सुतराम शक्यता नसल्याचे चर्चिले जात आहे.

आदिवासी नेतृत्व शंकरराव गायकवाड व ॲड. रामदास डवरे हे हा गट अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाल्यास रिंगणात उतरू शकतात. खुल्या प्रवर्गातही या दोन्ही नावाची चर्चा निघते.

माधव नारेवाड यांनी विविध माध्यमातून जनसंपर्कावर भर दिला असून ते अपक्ष की पक्षाकडून निवडणुकीसाठी शड्डू ठोकतात, हे लवकरच स्पष्ट होईल. राष्ट्रवादी काँग्रेसचे हिदायत पठाण यांच्या हालचाली लक्षवेधी ठरत आहेत.

आष्टी गट हा रद्द झालेल्या आरक्षणात इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी सुटला होता. हेच आरक्षण कायम राहिल्यास उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रमेश घंटलवार हे प्रबळ दावेदार आहेत. त्यांचे गाव याच गटात असून त्यांचा जनसंपर्क चांगला आहे.

काँग्रेसकडून बाजार समिती संचालक बाबुराव चोंडे यांचे नाव विरोधी इच्छुकांमध्ये धडकी भरत आहे. भाजपाचे बापूराव घारके यांनी नुकताच येवली येथे ज्येष्ठ नेते बाळासाहेब पांडे यांचा जंगी सत्कार घडवून स्वतःच्या दावेदारीला मजबूत करण्यात यश मिळवले आहे.

नाना गुद्दटवाड व नारायण आमदुरे या ठाकरे गटाच्या शिवसैनिकाचे नावही चर्चेत असून पिंपळगावचे शंकर आडे यांचे नावही चर्चेत आहे. आरक्षण जैसे थे राहिल्यास दोन्ही गटाचे चित्र फारसे बदलणार नसले तरी पण आरक्षण बदलल्यास मात्र इच्छुकांच्या नावांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.