Nanded : नांदेड जिल्ह्यातील प्रकल्प तुडुंब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded

Nanded : नांदेड जिल्ह्यातील प्रकल्प तुडुंब

नांदेड : जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या तुफान पर्जन्यवृष्टीमुळे दोन मोठ्या प्रकल्पासह नऊ मध्यम व ८० लघू प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. सध्या जिल्ह्यात एकूण १०४ प्रकल्पात ६७६.९४ दशलक्ष घनमीटरनुसार ९३ टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्या शेजारील महत्वाचे प्रकल्पही तुडूंब भरल्याने यंदा रब्बीसाठी चांगले दिवस आले आहेत.

जिल्ह्यात पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे लहान-मोठ्या नद्यांसह नाल्यांना पुर आला होता. यामुळे पावसाळ्यात संपूर्ण प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. जुलै महिन्यात तब्बल ६०६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यानंतरही सतत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच १०४ प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात ८०.७९ दलघमीनुसार १०० टक्के पाणीसाठा आहे. तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात १३४.२९ दलघमीनुसार ९७ टक्के पाणीसाठा आहे. यासोबतच जिल्ह्यातील नऊ मध्यम प्रकल्पात १३६.६८ दलघमीनुसार ९८.२८ टक्के पाणीसाठा आहे. चार कोल्हापुरी बंधार्‍यात ३.६२ दलघमीनुसार ४८.६३ टक्के, ८० लघू प्रकल्पात १७३.१४ दलघमीनुसार १०० टक्के पाणीसाठा आहे. नऊ उच्च पातळी बंधार्‍यात १५३.१५ दलघमीनुसार ८०.६९ टक्के पाणीसाठा आहे.

जिल्ह्यात एकूण १०४ प्रकल्पात ६७६.९४ दशलक्ष घनमीटरनुसार ९२.९३ पाणीसाठा आहे. यासोबतच नांदेड जिल्ह्याशेजारी असलेल्या परभणी जिल्ह्यातील येलदरी प्रकल्पात ८०३.७७ दलघमीनुसार १०० टक्के पाणीसाठा आहे. सिद्धेश्‍वर प्रकल्पात ७९.५० दलघमीनुसार ९८.२० टक्के तसेच यवतमाळ जिल्ह्यातील उर्ध्व पैनगंगा (इसापूर) या प्रकल्पात ९६४.१० दलघमीनुसार १०० टक्के पाणीसाठा आहे.