नांदेड - युवतीवरील अत्याचारप्रकरणी निषेध महामोर्चा; घोषणांनी शहर दणाणले, पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

शिवचरण वावळे
Monday, 21 December 2020

बिलोलीतील दिव्यांग युवतीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी (ता. २१) जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय निषेध महामोर्चा काढण्यात आला.

नांदेड - राज्यात मातंग समाजावर दिवसेंदिवस अन्याय, अत्याचार वाढत आहेत. समाजामध्ये विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. समाजावर अन्याय झाल्यानंतर पक्ष व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी राजकीय जोडे बाजूला सारून समाजासाठी एकत्र यावे, असे आवाहन माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले.

बिलोलीतील दिव्यांग युवतीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाच्या निषेधार्थ सोमवारी (ता. २१) जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीय निषेध महामोर्चा काढण्यात आला. त्यावेळी समारोपप्रसंगी माजी मंत्री श्री. बागवे बोलत होते. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चास आमदार रावसाहेब अंतापूरकर, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार अमर राजूरकर, राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गोविंद शिंदे नागेलीकर, माजी उपमहापौर उमेश पवळे, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद बोंढारकर, जिल्हा परिषदेच्या सदस्या पुनम पवार, डॉ. मीनल खतगावकर, कल्पना डोंगळीकर, भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले, ज्येष्ठ नेते सुरेश गायकवाड, नगरसेविका बेबी गोपिले, लहुजी शक्ती सेनेचे सोमनाथ कांबळे, डॉ. रेखा पाटील, संयोजन समितीचे मारोती वाडेकर, प्रा. सदाशिव भुयारे, प्रा. राजू सोनसळे, सतिश कावडे, गंगाधर गायकवाड, उज्ज्वला पडलवार, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस गणेश तादलापूरकर यांच्यासह आदींची उपस्थिती होती. 

हेही वाचा - नांदेड : कृष्णूर धान्य घोटाळ्यातील तिघांना अटक- सीआयडीची कारवाई, संतोष वेणीकर फरारच ​

घटनेची सीआयडीकरुन चौकशीची मागणी

यावेळी शिष्टमंडळाने बिलोली पोलिसांच्या तपासावर प्रश्‍न उपस्थित करून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे द्यावा, पीडितेच्या गल्लीतून शेजारील नागरिकांची नार्को टेस्ट करावी, नवीन शक्ती कायद्यानुसार हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे, पीडित मुलीच्या कुटूंबाचे पुनर्वसन करावे या व इतर मागण्यांचे निवेदन पालकमंत्री अशोक चव्हाण आणि जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना देण्यात आले. 
यावेळी संयोजन समितीचे मारोती वाडेकर म्हणाले की, बिलोली येथील घटना घडून १२ दिवस झाले तरी, नेमका आरोपी सापडला नाही. घटनास्थळावर पुरावे नष्ट करण्यात आल्याने त्यांनी प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल नाराजी व्यक्त केली. या संदर्भात पोलिसांसोबत वारंवार चर्चा करूनही पोलीस तपासाला गती देत नाहीत. पंधरा दिवसांत जिल्हा पोलिसांनी प्रकरणाचा योग्य तपास करून खरा आरोपी ताब्यात घेतला नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी संयोजन समितीच्यावतीने देण्यात आला. 

हेही वाचले पाहिजे - नांदेड : जवळगांव येथे 55 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह, मृतदेहाजवळ काळी पोत आढळून आल्याने घातपाताचा संशय ​

यांचीही उपस्थिती होती.

दरम्यान, यावेळी युवतीच्या कुटुंबियांना पुण्यातील नागरिकांच्या वतीने पन्नास हजाराच्या मदतीचा धनादेश श्री. बावगे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी हणमंत साठे, अनिल खंडागळे आदी उपस्थित होते. या मोर्चात साहेबराव गुंडिले, सुर्यकांत तादलापूरकर, संजय गोटमुखे, भालचंद्र पवळे, माधव डोम्पले, भारत सरोदे, संजय कुडके, महादेवी मठपती, सुनंदा जोगदंड, इरवंत सुर्यकर, राहूल जाधव, धनंजय सुर्यवंशी, मोहमंद पटेल, सईदा पटेल आदींची उपस्थिती होती. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded : Protest march on atrocities against young women The announcements rocked the city, the Guardian said Statement to the Collector Nanded News