नांदेडला दिलासा : बुधवारी ५३ नमुने अहवाल निगेटिव्ह

शिवचरण वावळे
Wednesday, 6 May 2020

५७ संशयितांचे अहवाल कसे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र यातील चार संशयितांचे अहवाल वगळता ५३ जणांचे अहवाल समाधानकारक आले आहेत.

नांदेड: दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यात ‘कोरोना’ बाधीत एकही रुग्ण आढळुन आला नाही. मंगळवारी (ता.पाच) मेपूर्वी घेण्यात आलेल्या व प्रलंबित असलेल्या ५७ संशयितांचे अहवाल बुधवारी (ता. सहा) सकाळी प्राप्त झाले. प्रलंबित ५७ नमुने अहवालापैकी ५३ संशयितांचे ‘स्वॅब’ नमुने निगेटिव्ह आले असल्याने नांदेडकरांना काहिसा दिलासा मिळाला आहे.

जिल्ह्यात ‘कोरोना’ विषाणू संसर्गाचे मंगळवार (ता. पाच) मे सायंकाळपर्यंत एक हजार २२० संशयितांची नोंद झाली होती. मंगळवारी पुन्हा २५ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. मात्र त्यापूर्वी पाठविलेल्या ५७ संशयितांचे अहवाल कसे येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र यातील चार संशयितांचे अहवाल वगळता ५३ जणांचे अहवाल समाधानकारक आले आहेत. आत्तापर्यंत एक हजार ३५४ नमुने तपासणी पूर्ण झाली. सध्या जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ३४ वर स्थिर आहे. तर कोरोना आजाराची लागण झालेल्या व अनेक व्याधी असलेल्या तीन जणांचा यापूर्वीच उपारादरम्यान मृत्यू झाला आहे.

हेही वाचा- लॉकडाऊन : ४० दिवसात ६७ लाखाचा मुद्देमाल जप्त...कुठे ते वाचा...
मंगळवारपासून शहरात एकही कोरोनाचा रुग्ण वाढला नसला तरी, चार दिवसापूर्वी गुरुद्वारा परिसरातील घेण्यात आलेल्या ९७ स्वॅब नमुन्यांपैकी २० जणास ‘कोरोना’ची लागण झाल्याचे उघड झाले. पैकी चार ‘कोरोना’ पॉझिटिव्ह रुग्णांचा अद्याप शोध लागत नसल्याने प्रशासन चांगलेच धास्तावले आहे. कराव तर काय कराव त्या चौघांचा शोध नेमका घ्यायचा कुठे हा प्रश्न जिल्हा प्रशासनापुढे आजही कायम आहे. कोरोनाची लागण झाली हे त्या चौघांना तरी माहिती आहे का? त्यांच्या संपर्कात रोज किती जण आले असतील आणि जेव्हा त्यांचा शोध लागेल तेव्हा नांदेडात ‘कोरोना’चा स्पोट झालेला असेल या भीतीने प्रशासन व नांदेडकर चांगलेच धास्तावले आहेत.

हेही वाचा- ‘त्या’ चार पॉझिटीव्ह रुग्णांवर गुन्हा दाखल

जिल्ह्याचे पालकमंत्री शहरात तळ ठोकुन असताना हा प्रकार घडला कसा असा सवाल सामान्य नागरीक उपस्थित करीत आहेत. इतर राज्यातून प्रवास करुन आलेल्याकडून देखील ‘कोरोना’ची भिती निर्माण झाली असताना (कोटा) राज्यस्थान येथून नांदेडला आलेल्या २४ विद्यार्थ्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. परंतू या सर्वच्या सर्व २४ विद्यार्थ्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाचा जिव भांड्यात पडला आहे. कोरोना बाधित असलेल्या सर्व रुग्णावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड आणि पंजाब भवन कोविड केअर सेंटर नांदेड येथे औषधोपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. जनतेने अफवांवर विश्वास न ठेवता मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये व प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded Relief On Wednesday 53 Sample Report Negative Nanded News