
नांदेड : मोकाट जनावरांमुळे ‘ट्रॅफिक जाम’
नांदेड - शहरातील रस्त्यावर पुन्हा एकदा मोकाट जनावरांचे कळप ठाण मांडून बसत आहेत. यातून वाहन चालविताना चालकांना कसरत करावी लागत असून अपघात होण्याची भीती त्यांच्यामध्ये आहे. स्थानिक प्रशासनाने याकडे लक्ष देवून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
सद्यस्थितीत शहरातील कोणत्याही मोठ्या किंवा छोट्या रस्त्याने जा, रस्त्यांच्या कामांमुळे एकेरी वाहतुक सुरु आहे. त्यामुळे ट्रॅफिक जाम रोजच होत आहे. त्यात भर पडत आहे मोकाट जनावरांची. शासकीय विश्रामगृह, पावडेवाडी नाका ते मोर चौक, मालेगाव रोडवरील भावसार चौक, आनंदनगर, शिवाजीनगर या ठिकाणी जनावरे रस्त्याच्या मधोमध ठाण मांडून बसलेले असतात. जणू काही या ठिकाणी त्यांचेच साम्राज्य आहे, असे वाटते.
मोकाट जनावरांमुळे होणारा वाहतुकीचा खोळंबा ही नागरिकांच्या डोकेदुखीत भर घालणारी ठरली आहे. चौकात रस्त्याच्या मध्यभागी किंवा वर्दळीच्या ठिकाणी जनावरांचा ठिय्या असतो. मालक जनावरे मोकळे सोडून देतात. प्रशासनाने याची दखल घेऊन जनावरे नेण्याकरिता पथक तयार करून मालकांवर कारवाई करावी, अशी मागणी आता नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.
महाविद्यालयीन, शाळकरी विद्यार्थ्यांना धोका
विशेष म्हणजे सकाळपासून मोकाट जनावरांचा कळप रस्त्यावर दिसून येतात. शहरात महाविद्यालये, शाळा तसेच खासगी शिकवणी वर्ग आहेत. शाळेत वेळेवर पोचण्यासाठी कोणी सायकलने तर कोणी पालकांच्या वाहनाने येतात. काही स्कूल बसने येतात. या मोकाट जनावरांचा त्रास विद्यार्थ्यांना होतो. मात्र, याबाबत स्थानिक प्रशासन पावले उचलत नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे.