नांदेड जिल्ह्यात २८८ केंद्रांवर होणार शिष्यवृत्ती परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Scholarship exam

नांदेड जिल्ह्यात २८८ केंद्रांवर होणार शिष्यवृत्ती परीक्षा

नांदेड - जिल्ह्यात पूर्व प्राथमिक इयत्ता पाचवी व माध्यमिक इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून २८८ केंद्रावर ता. ३१ जुलै रोजी परीक्षा होणार असून ३० हजार ३९५ विद्यार्थी परीक्षा देणार असल्याची माहिती प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे यांनी गुरूवारी दिली.

परीक्षेचे नियोजन, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिकांचे वितरण आणि परीक्षेदरम्यान करावयाची कार्यवाही या संदर्भाने गुरूवारी मल्टीपर्पज हायस्कूल येथे सर्व केंद्र संचालकांची बैठक झाली. या बैठकीत मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. त्यांच्यासोबत उप शिक्षणाधिकारी बंडू आमदूरकर, गट शिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के आणि अर्धापूरचे गट शिक्षणाधिकारी आर. एल. ससाने आदी उपस्थित होते.

इयत्ता पाचवीसाठी १८१ केंद्र तर आठवीसाठी १०७ केंद्र अशा २८८ केंद्रावर परीक्षा होणार आहेत. पाचवीसाठी १७ हजार ७९२ तर आठवीसाठी १२ हजार ६०३ असे एकूण ३० हजार ३९५ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. प्रत्येक केंद्रासाठी एक केंद्र संचालक नियुक्त करण्यात आला आहे. तीनशेच्या वर पटसंख्या असलेल्या सात शाळा असून या ठिकाणी केंद्र संचालकांसह सहकेंद्र संचालक नियुक्त करण्यात आले आहेत. या सर्वांची बैठकीस उपस्थिती होती.

संबंधित गट शिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी यांना या परीक्षेच्या अनुषंगाने जबाबदाऱ्या निश्चित करून दिल्या आहेत. विद्यार्थी व पर्यवेक्षित विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात अडचण आल्यास त्यांनी आपल्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना संपर्क करावा आणि मुख्याध्यापक- शिक्षकांना काही अडचण आल्यास त्यांनी आपल्या पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचे आवाहनही शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: Nanded Scholarship Exam 288 Centers Education Department

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..