
जि. प. प्रा. शाळा बामणी केंद्र पिंपळगाव (महादेव) येथे महिला शिक्षणदिन, सावित्रीबाई फुले जयंती निमित्ताने फौजदार शालिनी गजभारे यांनी साधला विद्यार्थ्यांशी व्हर्च्युअल संवाद
नांदेड : संबंध जगावर कोरोनाचे खूप मोठे संकट आले. त्याकाळात मानवजातीच्या अस्तित्वाचा म्हणजेच अगदी जीवन मरणाचा प्रश्न जगासमोर उभा राहिला. आजपर्यंत मानवजातीच्या इतिहासात कधीच घडले नाही. अश्या काही गोष्टी घडल्या. लॉकडाउनसारख्या गोष्टी घडल्या. या महामारीमुळे संपूर्ण जग बंद झाले. साहजिकच त्याचा परिणाम भारतीय शिक्षण व्यवसस्थेवर देखील झाला. प्रशासन व सर्वच शिक्षकांनी व्हर्च्युअल शिक्षणाचा मार्ग निवडला आणि ही ज्ञानाची गंगा आम्ही (शिक्षक- अधिकारी- प्रशासन) पालकांच्या सहकार्याने अविरत चालू ठेवली.
त्याचाच एक भाग म्हणजे ता. तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती व महिला शिक्षण दिन निमित्त जि. प. प्रा. शाळा बामणी येथील विषय शिक्षिका अंजली सोनार यांच्या संकल्पनेतून व जि. प. प्रा. शाळा बामणीचे मुख्याध्यापक व संपूर्ण स्टाफच्या सहकार्यामुळे व्हर्चुअल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून फौजदार शालिनी गजभारे (दामिनी पथक प्रमुख नांदेड शहर) तसेच प्रमुख मार्गदर्शक म्हणून महादेव पिंपळगाव बिटच्या शिक्षण शिक्षण विस्तार अधिकारी तथा कवयित्री सुचिता खल्लाळ, म. पिंपळगाव केंद्रप्रमुख विनोद देशमुख व प्रा. शा. बामणीचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री कोनेरी यांनी केले. सुरवातीला श्रेया बोडके शिक्षक मित्र यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित एक सुंदर गीत गायन केले. नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत कोरोना काळात शिक्षणाची गंगा अविरत ठेवणाऱ्या पिंपळगाव व अर्धापुर केंद्रातील शिक्षक मित्रांचा या प्रसंगी शिक्षण यौध्दा म्हणून गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले. नंतर फौजदार गजभारे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांना खूप प्रश्न विचारले व त्यांनी देखील आनंदाने उत्तरे दिली, त्यांचा जीवन परिचय दिला त्या कशा घडल्या याबद्दल माहिती दिली. विद्यार्थ्यांनी तुम्ही चोराला पकडल्यावर काय वाट्ते ? पोलिसांचे प्रशिक्षण टीव्हीमध्ये दाखवतात. त्याच प्रमाणे असते का ? की जास्त कष्ट घ्यावे लागतात ? बंदुकीतील गोळ्या खऱ्या असतात का? असे अनेक प्रश्न चिमुकल्या निरागस विद्यार्थ्यांनी विचारले आणि मनमोकळेपणाने संवाद साधला. व त्यांच्या प्रश्नांना गजभारे यांनी देखील अतिशय विद्यार्थ्यांना समजेल अशा शब्दांत उत्तरे देऊन प्रेरणा दिली.
येथे क्लिक करा - स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांसाठी असलेल्या बंदिस्त जोखडातून मुक्त करण्याचे काम अत्यंत जिद्दीने सावित्रीबाईंनी केले.
अनेक मुलींनी आम्हीही पोलिस अधिकारी बनणार असा विश्वास दिला. त्यानंतर विस्तार अधिकारी श्रीमती खल्लाळ यांनी सर्व उपस्थितांना सखोल असे मार्गदर्शन केले व पदवीपर्यत शिक्षण पूर्ण करण्यासाठी आईस पत्र हा त्यांचा जो उपक्रम चालू आहे. त्याबद्दल विचारणा करुन भावनिक साद घातली. उपक्रम राबवून मुलींना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले व त्यानंतर केंद्रप्रमुख श्री देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्या प्रमाणे सावित्रीबाई फुले यांनी समाजाचा विरोध पत्करुन शिक्षण देण्याचे कार्य केले, त्याचप्रमाणे कोरोना काळात ही सर्वांचा विरोध पत्करुन आपल्या आरोग्याची पर्वा न करता या काळात शिक्षण देऊन सावित्रीबाईंचा वारसा जपला अशी प्रतिक्रिया व्यक्त करुन त्यांचा गौरव केला.