esakal | नांदेड : आरडीक्स म्हणून जप्त; सिंदी बनविण्याचे रसायन असल्याचा संशय, रेल्वे पोलिसांची उडाली झोप, पोलिस अधीक्षकांसह एटीएस पथकाकडून चौकशी
sakal

बोलून बातमी शोधा

hajur sahib railway sation

नांदेड : आरडीएक्स म्हणून जप्त; सिंदी बनविण्याचे रसायन असल्याचा संशय, रेल्वे पोलिसांची उडाली झोप, पोलिस अधीक्षकांसह एटीएस पथकाकडून चौकशी

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : येथील हुजूर साहिब रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून उग्र वासाचे सहा किलो रसायन जप्त केले. सुरवातीला लोहमार्ग पोलिसांना वाटले की हा पदार्थ आरडीक्स आहे. त्यानंतर नांदेड पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, दहशतवादी विरोधी पथक, बाॅम्ब शोधक व नाशक पथक, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि लोहमार्ग पोलिसांनी संबंधीत व्यक्तीची कसून चौकशी केली. हा प्रकार रविवारी (ता. दोन) दिवसभर चालु होता. सोमवारी (ता. तीन) या पदार्थाची फॅारेन्सीक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठविण्यात आला असल्याचे पोलिस निरीक्षक सुरेश उणवणे यांनी सांगितले. आरोपीच्या सांगण्यावरुन तो पदार्थ सिंदी हा नशेला पदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र फाॅरेन्सीक लॅबच्या अहवालानंतरच हे स्पष्ट होणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हजुर साहेब रेल्वेस्थानकावर शनिवारी (ता. एक मे) फौजदार यलगुलवार हे आपल्या सहकाऱ्यांसह रात्रीची गस्त घालत होते. ते वेटींग रुमवॉजवळ येताच त्यांना एक संशयीत झोपलेला दिसला. त्याच्याजवळ एक बॅग होती. पोलिसांनी त्याला झोपेतून उठवले. तो नशेत होता. त्याची विचारपूस केली असता त्याची बोबडी वळली. पोलिसांनी त्याला सोबत घेऊन लोहमार्ग पोलिस ठाण्यात आणले. ठाण्यात बॅगची तपासणी केली असता त्यात उग्र वासाचा पदार्थ दिसून आला. या पदार्थाबद्दल विचारणा केली असता संबंधीत व्यक्ती पोलिसांना उडवाउडीचे उत्तरे देऊ लागला. प्राथमीक चौकशीत हे रसायन जप्त करून त्याची तपासणी केली असता बॉम्बसदृष्य वस्तु बनविण्याचे रसायन आहे की काय असा अंदाज पोलिसांनी बांधला.

घटनेची माहिती पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी लोहमार्ग पोलिस अधीक्षक वैभव कुलमुले, नांदेडचे पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांना कळविली. त्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक निलेश मोरे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, वजिराबादचे जगदीश भंडरवार यांच्यासह दहशतवादी विरोधी पथक आणि बाॅम्ब शोधक व नाशक पथकांनीही धाव घेतली. रेल्वेस्थानक परिसराला छावणीचे स्वरुप आले होते.

जप्त करण्यात आलेले रसायन नांदेड फॉरेन्सिक लॅब येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. फाॅरेन्सीक लॅबच्या अहवालावरुन हे रसायन नेमके काय आहे हे समजेल. मात्र अशा प्रकारचा पदार्थ हा नेहमी सिंदी तयार करण्यासाठी वापरतात असा दुजोरा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले. या प्रकरणानंतर मात्र लोहमार्ग पोलिसांची चांगलीच झोप उडाली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की परभणी येथील एक व्यक्ती हा निजामबाद येथून सिंदी तयार करण्यासाठी रसायन घेऊन तो परभणीसाठी कुठल्यातरी वाहनाने आला. रेल्वेने जाण्यासाठी तो रेल्वेस्थानकावर वेटिंग रुममध्ये थांबला होता. आणि यावेळी तो पोलिसांच्या तावडीत सापडला.

सोमवारी (ता. तीन) लोहमार्ग पोलिस अधीक्षक वैभव कुलमुले यांनी लोहमार्ग पोलिस ठाणे नांदेड येथे भेट दिली. प्रकरणाची सर्व माहिती पोलिस निरीक्षक सुरेश उणवणे यांनी त्यांना दिली. फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतर खरा प्रकार पुढे येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी (ता. चार) ताब्यात असलेल्या संशयीतास लोहमार्ग औरंगाबाद न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे श्री. उणवणे यांनी सांगितले.

loading image