नांदेड : स्थायी समिती सभापतीची निवड थर्टी फर्स्टला, अनेकांची फिल्डींग 

प्रल्हाद कांबळे
Sunday, 27 December 2020

सभापतीपदासाठी विरेंद्रसिंघ गाडीवाले, दिपाली मोरे यांच्यासह माजी सभापती किशोर स्वामी यांचे नाव सध्या आघाडीवर आहे.

नांदेड : शहराच्या विकासासाठी महत्वाची भुमिका बजावणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीची निवड करणे आवश्यक आहे. त्यामुळे नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदाची निवडणूक वर्षाच्या शेवटी म्हणजेच ता. 31 डिसेंबर रोजी विशेष सभेत होणार आहे. सभापतीपदासाठी विरेंद्रसिंघ गाडीवाले, दिपाली मोरे यांच्यासह माजी सभापती किशोर स्वामी यांचे नाव सध्या आघाडीवर आहे.

ता. 21 डिसेंबर रोजी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीवर नविन आठ सदस्यांची नावे घोषित करण्यात आली होती. त्यात सभागृह नेते विरेंद्रसिंघ गाडीवाले, किशोर स्वामी, बालाजी जाधव, ज्योती कदम, ईश्वरलाल यादव, खान अब्दुल अलिम खान, कुरेशी बेगम आणि कविता मुळे यांची निवड करण्यात आली होती.

हेही वाचानांदेड : बावीसाव्या बालकुमार साहित्य संमेलनाच्या समन्वयकपदी डॉ. हनुमंत भोपाळे -

या पूर्वीचे सभापती अमित तेहरा यांचा कार्यकाळ संपल्याने सभापतींची निवडणूक कार्यक्रम विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी घोषित केला आहे. ता. 31 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता ही निवडणूक स्थायी समिती सभागृहात होणार आहे. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डाॅ. विपीन यांना प्राधिकृत केलेले आहे.

सभापती पद मिळविण्यासाठी काँग्रेसमधील इच्छुक सरसावले असून वेगवेगळ्या माध्यमातून लॉबिंग केले जात आहे. असे असले तरीही काँग्रेस नेते अशोक चव्हाण हेच सभापती पदाचे नाव निश्चित करणार आहेत. कोरोना संकटानंतर विकासकामांना गती देण्यासाठी स्थायी समिती मभापती आवश्यक आहे.शहराच्या विकास आराखड्याला अंतिम स्वरुप देण्यासाठी स्थायी समितीची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्यामुळे सभापतिपदाला मोठे महत्त्व आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Selection of Standing Committee Chairman to Thirty First, fielding of many nanded news