नांदेड : आमदार, खासदारांना सवलती, मग आमच्या बंद का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded senior citizen railway travel discount off

नांदेड : आमदार, खासदारांना सवलती, मग आमच्या बंद का?

नांदेड : केंद्र सरकारने रेल्वे प्रवासातील भाड्यात ज्येष्ठ नागरिकांना मिळणारी सवलत बंद केल्याने ज्येष्ठांमध्ये प्रचंड नाराजी आहे. हा आमच्यावर अन्याय व अधिकारावर घाला असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया शहरातील ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. आमदार, खासदारांना सवलती मिळतात तर मग आमच्या बंद का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे प्रवासात सवलत मिळत आहे. मात्र, कोरोना काळात रेल्वेगाड्या बंद झाल्यामुळे सवलत तात्पुरती बंद करण्यात आली होती. सरकारने आता ही सवलत कायमस्वरुपी बंद केली आहे.

शिवाय पुन्हा सुरु करण्याचा विचारही नसल्याचे म्हटले आहे. सरकारच्या मते, बहुतांश श्रेणीतील भाडे आधीच कमी आहे. कोरोनाकाळात कमी प्रवाशांनी रेल्वे प्रवास केला. सवलतीमुळे रेल्वेला तब्बल पाच हजार कोटींचा भुर्दंड पडला. याच कारणांमुळे ही सवलत बंद करण्यात येत असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. ज्येष्ठ नागरिक या मताशी सहमत नाहीत.

ज्येष्ठ नागरिक संघटनांना अपयश

सवलत सुरु पूर्ववत सुरु करण्याबात ज्येष्ठ नागरिक संघटनांनी पंतप्रधान, रेल्वे मंत्री, वित्त मंत्री यांच्याकडे पत्र पाठवून पाठपुरावा केला. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या रेल्वे मंत्रालयातर्फे तिकिटांमध्ये ज्येष्ठ महिलांना ५० टक्के, तर पुरुषांना ४० टक्के सवलत मिळत होती. सद्यस्थितीत देशात ३० कोटी व राज्यात तीन कोटी ज्येष्ठ नागरिक आहेत. त्या सर्वांना या निर्णयाचा फटका बसत आहे.

घटनेने ज्येष्ठांना अधिकार दिलेत

घटनेत ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक व सामाजिक संरक्षण दिले आहे. याअंतर्गत सरकारने आम्हाला अनेक सवलती दिल्या आहेत. रेल्वे सवलत त्यापैकीच एक आहे. सवलत देऊन सरकार आमच्यावर उपकार करत नाही. तो आमचा अधिकारी आहे. ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा किंवा कामानिमित्त रेल्वे प्रवास करावा लागतो. अनेक ज्येष्ठ नागरिकांची आर्थिक परिस्थिती खराब आहे. महागाई दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे आधीच जगणे कठीण झाले आहे. त्यात सवलत बंद झाल्याने आणखीनच त्रास होणार आहे. खासदार, आमदार व मंत्र्यांना भरमसाठ वेतन व पेंन्शनसह इतरही सवलती दिल्या जात आहेत. ज्येष्ठांना दिल्या जाणाऱ्या सवलती मात्र त्यांच्या डोळ्यात खुपतात, अशी परिस्थित दिसून येत आहे.

ज्येष्ठांना घरी बसून सोयीसुविधा हव्या आहेत. कुणीही रस्त्यांवर येऊन आंदोलन करीत नाही. शहरात असंख्य ज्येष्ठ नागरिक असताना, आंदोलनात फक्त दहा ते वीस लोक येतात. असे चित्र असेल तर कसे काय सरकार आमच्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार आहे. सरकारवर खरोखरच दबाब आणायचा असेलतर एकजूट होणे आवश्यक आहे.

- हरिहरेश्वर खरात पाटील, ज्येष्ठ नागरिक.

ज्येष्ठांची सवलत बंद करणे, खूपच दुःखदायक आहे. रेल्वेला तोटा होत असल्याचे कारण देण्यात येत असले तरी यात आमचीही चूक आहे. मुळात ज्येष्ठ नागरिकच उदासीन आहे. त्यामुळे ज्येष्ठांच्या मागण्यांसाठी सर्व ज्येष्ठांनी एकवटल्याशिवाय पर्याय नाही.

- शारदाबाई सोनकांबळे, ज्येष्ठ नागरिक.

Web Title: Nanded Senior Citizen Railway Travel Discount Off

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top