नांदेड - सत्तर टक्के कोरोना बाधितांना उपचारानंतर दिलासा,शुक्रवारी २८३ पॉझिटिव्ह; दिवसभरात पाच रुग्णांचा मृत्यू 

शिवचरण वावळे
Friday, 18 September 2020

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. शहरातील शासकीय व खासगी रुग्णालय, कोविड सेंटर फुल्ल भरले आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना वेळेवर बेड, आॅक्सिजन उपलब्ध होत नसल्याने मृत्यूला देखील सामोरे जावे लागत असल्याच्या घटना घडत आहेत

नांदेड - कोरोनाबाधित रुग्णांची मागील दोन दिवसांपासून आकडेवारी कमी होत असून, शुक्रवारी (ता.१८) प्राप्त झालेल्या आहवालात २८३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, पाच रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू आणि २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दहा दिवसाच्या उपचारानंतर सत्तर टक्के पॉझिटिव्ह रुग्ण बरे होत असल्याचा दावा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकातुन माहिती देताना केला आहे. 

मागील काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. शहरातील शासकीय व खासगी रुग्णालय, कोविड सेंटर फुल्ल भरले आहे. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांना वेळेवर बेड, आॅक्सिजन उपलब्ध होत नसल्याने मृत्यूला देखील सामोरे जावे लागत असल्याच्या घटना घडत आहेत. गुरुवारी (ता.१७) तपासणीसाठी घेण्यात आलेल्या स्वॅबपैकी शुक्रवारी (ता.१८) एक हजार १५६ अहवाल प्राप्त झाले, यातील ८२२ निगेटिव्ह तर, २८३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या १२ हजार ९८४ इतकी झाली आहे. 

 हेही वाचा- बेरोजगारांसाठी पिठाची गिरणी ठरतेय उपजिविकेचे साधन ​

२७७ रुग्ण कोरोनामुक्त 

गेल्या २४ तासात पवार गल्ली लोहा पुरुष (वय ५३), कंधार पुरुष (वय ६३), भोकर पुरुष (वय ६४), गांधीनगर बिलोली पुरुष (वय ७०), इस्लापूर किनवट पुरुष (वय ३८) या पाच कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आतापर्यंत ३४३ बाधित रुग्णांनी कोरोनावर उपचार सुरू असताना जिव गमावला आहे. दहा दिवसांच्या उपचारानंतर शुक्रवारी विष्णुपुरीच्या शासकीय रुग्णालयातून- १७, एनआरआय, पंजाब भवन, महसूल भवन आणि होम क्वॉरंटाईन मधील - १६७, अर्धापूर- १९, लोहा- १०, माहूर- पाच, नायगाव - एक, देगलूर- दोन, बिलोली- सात, मुखेड- २५ आणि खासगी रुग्णालयातील २४ असे एकूण २७७ रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना कोरोनामुक्त घोषीत करण्यात आले आहे. आतापर्यंत आठ हजार ७५७ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. 

हेही वाचले पाहिजे- Video - मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची अशोक चव्हाणांची ग्वाही ​

एक हजार ३२० जणांचा अहवाल येणे बाकी 

शुक्रवारी जिल्ह्यासह नांदेड वाघाळा महापालिका- १५९, नांदेड ग्रामीण- १२, लोहा-१३, हदगाव-१०, कंधार-चार, बिलोली-१५, अर्धापूर-नऊ, किनवट-१२, मुखेड-१५, धर्माबाद-नऊ, भोकर-तीन, नायगाव-सात, हिमायतनगर-दोन, मुदखेड-चार, देगलूर-एक, हिंगोली-सात आणि यवतमाळ- एक असे २८३ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या तीन हजार ८१७ रुग्णांवर उपचार सुरू असून त्यापैकी ३४ रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. एक हजार ३२० जणांचा अहवाल येणे बाकी असून, शनिवारपर्यंत अहवाल येण्याची शक्यता आहे. 

कोरोना मीटर

शनिवारी पॉझिटिव्ह- २८३ 
शनिवारी कोरोना मुक्त- २७७ 
शनिवारी मृत्यू- पाच 
एकूण पॉझिटिव्ह रुग्ण- १२ हजार ९८४ 
आतापर्यंत कोरोना मुक्त- आठ हजार ७५७ 
एकूण मृत्यू- ३४३ 
उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या- तीन हजार ८१७ 
गंभीर रुग्ण- ३४ 
अहवाल प्रतिक्षेत- एक हजार ३२० 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Seventy percent corona sufferers relieved after treatment, 283 positive on Friday; Five patients died during the day Nanded News