esakal | नांदेड : शांतीधाम गोवर्धन घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार; नातेवाईकांना अंत्यविधी पाहता येणार

बोलून बातमी शोधा

सीसीटीव्ही कॅमेरा
नांदेड : शांतीधाम गोवर्धन घाटावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार; नातेवाईकांना अंत्यविधी पाहता येणार
sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड ः कोरोना काळात अनेकांच्या जवळची जिवा भावाची माणसे डोळ्यादेखत निघून जात आहेत. कोरोनाच्या भितीने अनेकांना त्यांच्या शेवटच्या दर्शनासाठी देखील नातेवाईकांना हजर राहता येत नाही. यासाठी शांतीधामने पुढाकार घेतला असून, गोवर्धन घाटावर केवळ सीसीटीव्ही कॅमेरे न लावता नातेवाईकांना शेवटच्या प्रवासाला निघालेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचे घरी राहून अंत्यदर्शन घेता यावे यासाठी एक लिंक व पासवर्ड आयडी उपलब्ध करुन दिला जाणार आहे. त्याद्वारे नातेवाईकांना अंत्यविधीत सामिल होता येणार आहे.

याविषयी अधिक माहिती देताना शांतीधाम ट्रस्टचे हर्शद शहा यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले की, आईवडीलाने मुलास उच्चशिक्षण देऊन परदेशात नोकरीला पाठवलेली अनेक मुले आईवडीलांच्या शेवटच्या क्षणी त्यांच्या सोबत नसतात. इतकेच नव्हे तर त्यांना मुखाग्णी देणे सुद्धा त्यांच्या नशिबात नसते. परदेशातील मुले आॅनलाइनच्या माध्यमातून आईवडिलांचे अंतिम दर्शन घेतल्याच्या काही घटना वाचनात आल्या आहेत. परंतु कोरोना किंवा नैसर्गिक मृत्यू झाला तरी, नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी इच्छा असताना देखील घाटापर्यंत जाता येत नाही. कोरोनामुळे अशी स्थिती उद्भवली आहे. त्यांच्यासाठी मेल आयडी व पासवर्डद्वारे आॅनलाइन सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

हेही वाचा - नांदेडकरांनो आरोग्य सांभाळा : वाढत्या तापमानात अशी घ्या काळजी...!

मेल आयडी व पासवर्डद्वारे आॅनलाइन सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार

आज अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावली जातात. गोवर्धन घाटावर देखील पुढील तीन ते चार दिवसात सीसीटीव्ही कॅमेरे लावली जाणार आहेत. त्यासाठी लोकसहभाग मिळाला नसला तरी, स्वखर्चातुन हे काम पूर्णत्वास नेणार असून, केवळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवून न थांबता नातेवाईक, मित्रपरिवारातील प्रत्येकास आपल्या जवळच्या व्यक्तीचे शेवटचे दर्शन घेता यावे यासाठी त्यांना लिंक व विशेष पासवर्ड दिला जाणार असून, त्याद्वारे भावनिकरित्या सर्वांना जवळ येण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा माणस आहे.

राज्यातील पहिलीच स्मशानभूमी ः

एकाच घरातील अनके व्यक्तीस कोरोनाची लागण होत आहे. त्यामुळे अनेकांची घालमेल होत आहे. इतकेच नव्हे तर, घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला तरी त्याच्या शेवटच्या अंत्यविधीसाठी देखील हजर राहता येत नाही. त्या व्यक्तीचे शेवटचे दर्शन देखील होत नाही. अशा सर्वांसाठी शांतीधामची ही सुविधा सोईची ठरणार आहे. राज्यातील अनेक स्मशानभूमित सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आली आहेत. परंतु नातेवाईकांसाठी आॅनलाइन अंत्यदर्शन सुविधा कुठेही उपलब्ध नसल्याचे बघण्यात नाही. त्यामुळे नातेवाईकांना आॅनलाइन अंत्यदर्शन घडवून आणणारे नांदेड शहर हे राज्यातील पहिलीच स्मशानभूमी असेल असा अंदाज देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे