esakal | नांदेडकरांनो आरोग्य सांभाळा : वाढत्या तापमानात अशी घ्या काळजी...!

बोलून बातमी शोधा

तापमान
नांदेडकरांनो आरोग्य सांभाळा : वाढत्या तापमानात अशी घ्या काळजी...!
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : वाढत्या तापमानामुळे आरोग्याच्या समस्या वाढत जाऊ नये यासाठी नागरिकांनी अगोदरच काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या एप्रिल महिना संपत असून त्यात तीन ते चार दिवसापासून सूर्य आग ओकत आहे. नागरिकांनी आरोग्य सांभाळावे असा सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.

उन्हाळा सुरु झाल्यामुळे ऋतूतील झालेल्या बदलामुळे विविध प्रकारचे आजार उद्भवतात. यामध्ये प्रामुख्याने त्वचा विकार तसेच उष्माघाताचा समावेश आहे. उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्यासाठी प्रतिबंधक उपाय बरोबरच काही दक्षता आणि खाण्यापिण्यावर बंधने ठेवणे तेवढेच महत्त्वाचे आहे. उन्हाळ्यामुळे साधारणतः सर्वत्र उष्णतेमुळे जाणवणारा दहाक परिणाम म्हणजे उष्माघात. यामध्ये शरीराचे तापमान उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार न मिळाल्यास संबंधित व्यक्ती दगावण्याची शक्यता अधिक असते.

हेही वाचा - नांदेडमध्ये खळबळ : वनविभागाच्या दप्तरदिरंगाईमुळे शिवदास ढवळेंचे आत्मदहन; वनविभागाच्या जमिनीवरच झाला कोळसा

जिल्ह्यात तापमानाचा पारा 40 ते 42 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे. यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यामुळे उन्हाळ्यात लस्सी, लिंबू पाणी, ताक आदीचा वापर नियमित करण्यात यावा. तहान लागलेली नसली तरी जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे. उन्हापासून बचाव म्हणून नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

अशी घ्यावी काळजी

अंगावर हलकी, पातळ, सुती कपडे वापरावेत, बाहेर जाताना गॉगल, टोपी, बूट व चप्पलचा वापर करावा. उन्हात काम करत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी सतत येणारा घाम इत्यादी. उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावी व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरचा सल्ला घ्यावा. बाहेर कामकाज करत असताना मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करण्यात यावा.

काय करु नये

शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी व थंड पेयांचा वापर टाळावा. दुपारी बारा ते तीन कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याची टाळावे, बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी, शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे.