Nanded : शिवाई ॲग्रो टूरिझम : जीवामृत शेतीची प्रयोगशाळा
Nanded : दै. 'सकाळ' माध्यम समूहातील संपादक, आमचे मेहुणे संदीप काळे यांच्याकडून शिवाई ॲग्रो टूरिझमचे नाव अनेकदा ऐकले होते. एकदा भेट देऊन अनुभव घेण्याची उत्कट इच्छा होती, पण योग येत नव्हता. परवा कोकण-कोल्हापूरच्या सहलीवरून परत येत असताना हा योग जुळून आला. जुळून आला, म्हणण्यापेक्षा संदीप काळे यांनीच हा योग जुळवून आणला.
खेड - शिवापूर पथकर नाक्याजवळ, महामार्गाच्या पूर्वेला, वेळू गावाच्या शिवारात, एक - दीड किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.शेतात जायचा रस्ता जेमतेम एक गाडी जाईल इतका अरुंद आणि कच्चा पांदणरस्ता आहे. असे असले तरी नाना पाटेकर, सयाजी शिंदे, युक्ता मुखी यांसारखे सेलिब्रिटी या ठिकाणाला आवर्जून भेट देत असतात. घुले परिवाराच्या पाहुणचाराचा आनंद घेत असतात.
घुले परिवाराची इथे फक्त साडेतीन एकर शेतजमीन आहे. ह्या विकसनशील परिसरात सगळे कारखाने आणि उद्योगधंदे आहेत. हल्ली महानगरांनी जवळपासची खेडी गिळंकृत केली आहेत. अशा अपरिहार्य परिस्थितीत जमिनी गमावलेल्या भूमिपुत्रांना 'भुई भुई ठाव दे' असे म्हणण्याची वेळ आली आहे. आता इथे शेतजमीन किती शिल्लक राहिली असेल, हा एक संशोधनाचा विषय आहे. अशा परिस्थितीत घुले परिवाराने आपली शेतजमीन टिकवून ठेवली आहे. नुसती टिकवून ठेवली नाही, तर आपल्या पद्धतीने, भूमिनिष्ठेने ती विकसित केली आहे. काळ्या आईवरचे त्यांचे प्रेम देवभक्तीपेक्षा तसूभरही कमी नाही.
मा. सुभाष पाळेकर यांच्याकडून प्रेरणा घेऊन घुले परिवार इथे सेंद्रीय पद्धतीने शेती करतो. ते आपल्या शेतातच जीवामृत तयार करतात आणि रासायनिक खतांचा वापर टाळून जीवामृताचा वापर करतात. (जीवामृत तयार करण्याची पद्धती आपल्याला एका फोटोत पाहायला मिळेल) आपल्या शेतीत विषमुक्त अन्नधान्य, फुले, फळे आणि भाजीपाला पिकवतात. 'आम्ही विषमुक्त अन्न खाणार आणि इतरांनाही विषमुक्तच अन्न खाऊ घालणार!' हे घुले परिवाराचे जणू ब्रीदवाक्यच आहे.
घुले परिवाराने आमचे फारच मनापासून स्वागत केले. दुर्मीळ असे एक फुलांचे रोपटे देऊन आमचा सत्कार केला. इथे आल्यावर आम्हाला गणगोतात आल्यासारखेच वाटत होते. त्यांनी आम्हाला संपूर्ण शेती फिरून दाखवली. त्यांनी शेतीत केलेले नावीन्यपूर्ण प्रयोग दाखवले. इथे काही अकल्पित चमत्कार पाहायला मिळतात. घुले परिवाराने जीवामृताचा वापर करून तीन फूट लांबीचे दोडके आणि भोपळे पिकवले आहेत. चार फूट लांबीच्या शेवग्याच्या शेंगा पिकवल्या आहेत.बोराच्या झाडाला बोरं लगडल्यासारखे टोमॅटोच्या वेलीला अक्षरशः शेकडो टोमॅटो लगडले आहेत.
बटाटे जमिनीत लागतात, हे आपल्याला माहीत आहे. इथे वेलीला हवेत बटाटे लागले आहेत. हे जगातील आठवे आश्चर्य म्हणावे लागेल. जांभळाच्या झाडाला जांभळी फळे लागतात, हे त्रिकालाबाधित सत्य आहे. शिवाई ॲग्रो टूरिझममधील झाडाला पांढरी जांभळे पाहून आश्चर्याचा सुखद धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. खरे तर पुणे परिसरातील हवामान सफरचंदाच्या पिकाला फारसे अनुकूल नाही, तरी इथे झाडाला सफरचंद लागले आहेत. हा परिवार स्ट्रॉबेरीचेही उत्पादन घेतो. अशी बरीच अपारंपारिक पिके इथे घेतली जातात.
जीवामृताचा वापर करून, सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या घुले यांच्या अन्नधान्याला आणि भाजीपाल्याला पुणे शहरात प्रचंड मागणी आहे. आरोग्याविषयी सजग असलेले ग्राहक त्यांच्या व्हाट्सऐप समूहात आपली मागणी नोंदवतात. चि. प्रसाद घुले स्वतःच्या कारमधून ह्या वस्तू नेऊन घरपोच सेवा देतात. घुले यांची शेतीउत्पादने हातोहात संपतात, कारण पुरवठ्यापेक्षा मागणी अधिक आहे.
शिवाई ॲग्रो टूरिझम हे काही हॉटेल किंवा उपाहारगृह नव्हे. पुरेशी आधी कल्पना देऊन ठेवली, तर यजमान आपल्या जेवणाची छान सोय करतात. संदीप काळे यांनी आधीच सांगून ठेवल्यामुळे घुले परिवाराने आमच्या जेवणाची उत्तम व्यवस्था केली होती. चुलीवर भाजलेल्या भाकरींचा आणि इंद्रायणी तांदळाच्या भाताचा नुसता घमघमाट सुटला होता. त्या सुगंधामुळे बारीकशी भूक वाढाळू बनली होती. रसायनयुक्त अन्नपदार्थ आणि विषमुक्त अन्नपदार्थ यांच्या चवीतील फरक लगेच लक्षात आला. सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या अन्नाचा आम्ही मनसोक्त आस्वाद घेतला. 'अन्न हे पूर्णब्रह्म' ह्या वचनाचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. रुचकर, स्वादिष्ट आणि पौष्टिक पदार्थांमध्ये यजमानांचे प्रेम विरघळल्यामुळे ती चव दीर्घकाळ जिभेवर रेंगाळत राहते. घुले परिवाराचे अगत्य, प्रेम आणि स्वागतशीलता शब्दातीत आहे. इथे कुणी नोकरचाकर नाहीत. घुले परिवारातील सर्व सदस्य ही सगळी कामं प्रेमानं करतात. 'श्रममेव जयते' हा मंत्र ह्या परिवाराने आत्मसात केला आहे.
आम्ही जेवण करत असताना यजमानांना नांदेड जिल्ह्यातील कळका येथील गायकवाड नामक एका शेतकऱ्याचा फोन आला. ते जीवामृत शेतीविषयी घुले यांचे मार्गदर्शन घेत होते. गायकवाडांनी यापूर्वी ही शेती पाहिली आहे. त्यांचा संवाद झाल्यावर त्यांनी मला फोन दिला. गायकवाडांशी झालेल्या संवादातून ते आमचे विद्यार्थी आहेत, हे समजले. घुले यांच्या जीवामृत आधारित शेतीची कीर्ती आता महाराष्ट्रभर पोहोचली आहे. घुले यांना 'प्रयोगशील आणि शेतिनिष्ठ शेतकरी' म्हणून शासनाच्या पुरस्कारासह इतर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कारांपेक्षाही घुले परिवाराची शेतीवरची अव्यभिचारी निष्ठा मला फार महत्त्वाची वाटते.
घुले यांचे काम समाजासाठी पथदर्शी (पायलट) आहे. शिवाई ॲग्रो टूरिझम ही सेंद्रीय शेतीची प्रयोगशाळा आहे. विषमुक्त शेती ही काळाची गरज आहे. आमच्या नांदेड जिल्ह्यातील काही शेतकरी असे प्रयोग करत आहेत. हे प्रयोग जितके वाढतील, तितके ते सामाजिक आरोग्यासाठी आवश्यकच आहेत. घुले यांनी दिलेल्या जीवामृतामुळे आमच्या बाल्कनीतील फुलझाडे अगदी टवटवीत झाली आहेत. जीवामृताधारित सेंद्रीय शेतीविषयी कुतूहल असणाऱ्यांनी शिवाई ॲग्रो टूरिझमला एकदा भेट दिलीच पाहिजे. ह्या प्रयोगाविषयी उत्सुकता आणि आस्था असणार्यांसाठी घुले यांचा संपर्क क्रमांक देतो आहे.
श्री. गुलाब घुले : 9762830396
प्रसाद घुले : 8625855622
डॉ. सुरेश सावंत, नांदेड.
sureshsawant2011@yahoo.com
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.