नांदेड : लॉकडाऊनच्या कालावधीत दुकाने, आस्थापनांना वेळेची मुभा- डाॅ. विपीन

file photo
file photo

नांदेड : नांदेड जिल्‍हयात सर्व प्रकारचे दुकाने, आस्‍थापना उघडणे व बंद करण्याच्या वेळेच्या बंधनात मुभा देण्यात आली आहे. जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार नांदेड जिल्हयात ता. एक ऑक्टोंबर रोजीचे बारा वाजेपासून ते ता. 31 ऑक्टोंबरपर्यंत बारा वाजेपर्यंत पुढीलप्रमाणे सुधारित आदेश दिले आहेत.

राज्यात कोविड-19 च्या अनुषंगाने दिलेल्या सुधारीत सुचना व पुन्हा सुरु मोहिमेंतर्गत शासनाने आदेश निर्गमीत केले असून लॉकडाऊनचा कालावधी 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आला आहे. त्याअनुषंगाने या आदेशातील परिशिष्‍ट -1 नुसार  कोविड- 19 चे व्यवस्थापनाच्या अनुषंगाने पुढील राष्ट्रीय निर्देशांचे पालन करणे बंधनकारक असून पालन न झाल्यास दंडात्मक, फौजदारी कारवाईस पात्र राहील. सार्वजनीक ठिकाणी, घराबाहेर व घरामध्ये जेथे लोकांचा वावर आहे तेथे असताना चेह-याचे तोंडावर व नाकावर मास्कचा वापर न करणाऱ्या व्यक्तींवर एक हजार रुपयाचा दंड आकारावा. दुकानामध्ये प्रत्येक ग्राहकामध्ये किमान सहा फुट अंतर राहील याची खात्री करावी तसेच दुकानामध्ये एकावेळी पाचपेक्षा जास्त व्यक्तींना घेणेस मनाई करणेत आली आहे. ग्रामीण व शहरी दोन्ही भागात या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी. 

नांदेड जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये कोणतेही कार्यक्रम आयोजीत करणेस मनाई आहे. परंतू प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात खुले लॉन, विना वातानुकूलित मंगल कार्यालय/ हॉल  सभागृह, घर  व घराच्या परिसरात 50 लोकांच्या (संपुर्ण कार्यक्रमासाठी) मर्यादेत लग्न संबंधित समारंभाचे आयोजन तसेच या कार्यालयाने वेळोवेळी दिलेले आदेश व अटी व शर्तींचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. अंत्यविधी यासारख्या कार्यक्रमास 20 पर्यंत व्यक्तींना सामाजिक अंतर ठेऊन उपस्थित राहण्यास  परवानगी राहील. नांदेड जिल्हयातील कोणत्याही सार्वजनिक अथवा ज्या ठिकाणी लोकांचा वावर जास्त प्रमाणात आहे अशा खाजगी जागेच्या ठिकाणी थूंकणेस मनाई असून, थुंकल्यास एक हजार रुपये दंड आकारावा. सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा /तंबाखु इत्यादी सेवन करणेस मनाई करण्यात आली आहे.

कामाच्या ठिकाणी पुढील अतिरिक्त निर्देशांचे पालन करणे संबंधितांवर बंधनकारक राहील. 

शक्य असेल त्या ठिकाणी घरातुन काम करण्यास प्राधान्य दयावे. कामाच्या आणि व्यावसायाच्या वेळा या कार्यालयामध्ये, कामाच्या ठिकाणी मार्केटमध्ये, औद्योगिक तसेच व्यावसायिक आस्थापनेमध्ये गर्दी होणार नाही, अशा पद्धतीने विभागून द्याव्यात. थर्मल स्कॅन, हॅडवॉश, सॅनिटायझर याची आत व बाहेर जाण्याच्या ठिकाणी व्यवस्था करावी. कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक उपयोगाच्या जागा व सामान्य माणसाच्या वापरात येणाऱ्या सर्व जागा व  वस्तू यांचे वेळोवेळी सॅनिटायझेशन करणेत यावे. औद्योगिक व व्यावसायिक आस्थापना यांनी त्यांचे कामगारामध्ये, कामाची पाळी बदलणेचे वेळी, जेवणाचे व इतर सुट्टीचे वेळी, कामावर येताना व कामावरुन सुटताना शारिरीक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

परिशिष्‍ट- 2 नुसार कन्टेमेंट प्रतिबंधीत क्षेत्र

ता. 19 मे 2020 व 21 मे 2020 रोजीच्‍या आदेशानुसार जिल्‍ह्यामध्‍ये तयार करण्‍यात येत असलेले कन्‍टेमेंट झोन हे पुढील आदेशापर्यंत कायम राहतील. केंद्र शासनाने  व राज्‍यशासनाने पुर्वी दिलेल्‍या सूचना जशास तसे लागू  राहतील.

नांदेड जिल्हा कार्यक्षेत्रात पुढील बाबींना मनाई करण्यात आली आहेत (प्रतिबंधीत / बंद क्षेत्रे) 

सर्व शाळा, महाविदयालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, कोचिंग इंस्टीटयुट हे 31 ऑक्टोंबर  2020 पर्यंत बंद राहतील. परंतू ऑनलाईन / दुरस्‍थ शिक्षणास परवानगी राहील. चित्रपट गृहे, जलतरण तलाव, करमणूक उदयाने, थिएटर, असेंबली हॉल  यासारख्या इतर सर्व जागा बंद राहतील. MHA ने परवानगी दिलेल्‍या व्‍यतीरिक्‍त आंतरराष्‍ट्रीय वाहतुक. सर्व सामाजिक, राजकिय, क्रिडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व इतर मेळावे तसेच मोठया संख्येने लोक जमा होणारे कार्यक्रम, परिषदा बंद राहतील. मनाई केलेल्‍या बाबी व्‍यतिरिक्‍त ज्‍या दुकाने, आस्‍थापनांना चालू ठेवण्‍यास मुभा देण्‍यात आली आहे. अशा सर्व  दुकाने व आस्‍थापनांना, त्‍याचप्रमाणे हॉटेल, फुड कोर्टस्, रेस्‍टॉरन्‍टस् आणि बार त्‍यांच्‍याशी निगडीत दुकाने आस्‍थापनाचे अनुज्ञप्‍ती, परवाण्‍यामध्ये दिलेले वेळेनुसार उघडणे, बंद करणे व कार्यरत ठेवता येतील. (जसे महाराष्‍ट्र दुकाने व आस्‍थापना अधिनियम व  इतर अनुषंगिक तरतुदीनुसार प्राप्‍त परवाना, अनुज्ञप्‍तीधारकाच्‍या परवाण्‍यात दिलेल्‍या वेळा) तसेच कोव्‍हीड -19 चा प्रादुर्भाव रोखण्‍याच्‍या अनुषंगाने शासनाने व या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेले उपाययोजनेचे सर्व सबंधित दुकाने, आस्‍थापनाधारकास काटेकोरपणे पालन करणे आवश्‍यक व बंधनकारक राहील.

यापुर्वी शासनाने तसेच वेळोवेळी परवानगी दिलेल्‍या बाबी / क्षेत्रे पूर्ववत सुरु राहतील आणि यापुर्वी दिलेले आदेश सदर आदेशास सलग्‍न राहतील आणि सदरचे आदेश ता. 31 ऑक्टोंबर 2020 पर्यंत कायम  राहतील. हॉटेल्‍स, फुड कोर्टस, रेस्‍टॉरन्‍टस् आणि बार ता. पाच ऑक्‍टोबर 2020 पासून आस्थापनेच्‍या क्षमतेच्‍या  50 टक्‍के क्षमतेसह सुरू राहतील. ऑक्‍सीजन उत्‍पादन व वाहतुक करणा-या वाहनांच्‍या हालचालीस राज्‍यात व राज्‍याबाहेर कोणत्‍याही  प्रकारचे बंधन असणार नाही. यापुर्वी परवानगी देण्‍यात आलेल्या क्रिया/ बाबी नेमूण दिलेल्‍या आदर्श कार्यप्रणाली सूचनेप्रमाणे (SOP)  चालू  राहतील. जिल्हयात सार्वजनिक ठिकाणी, लोकांचा वावर असणाऱ्या तसेच वाहतुकीच्या साधनामध्ये मास्‍कचा वापर  करणे, सॅनिटायझरचा वापर, शारिरीक अंतर पाळणे बंधनकारक आहे.

परिशिष्‍ट-3 नुसार मा.संचालक पर्यटन विभाग, महाराष्‍ट्र शासन मुंबई यांनी हॉटेल्‍स, फुड कोर्टस, रेस्‍टॉरन्‍टस् आणि बारसाठी निर्गमित केलेली मार्गदर्शक प्रणालीचे तंतोतंत पालन करणे आवश्‍यक आहे. सदरील (SOP) यासोबत जोडून देण्‍यात येत आहे. या आदेशाचे तंतोतंत पालन होते किंवा नाही याबाबी तपासून आवश्‍यक कायदेशीर व दंडात्‍मक कारवाई करण्‍यास खालील यंत्रणेस प्राधिकृत करण्‍यात आले आहे.  महानगरपालिका हद्दीत महानगरपालिका, पोलीस विभाग, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क व अन्‍न व औषध प्रशासन विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत. नगरपालिका हद्दीत नगरपालिका, पोलीस विभाग, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क व अन्‍न व औषध प्रशासन विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत. गावपातळीवर ग्रामपंचायत,पोलीस विभाग, राज्‍य उत्‍पादन शुल्‍क व अन्‍न व औषध प्रशासन विभाग यांनी संयुक्‍त पथके गठीत करावीत.

या आदेशाची अंमलबजावणी करण्यास संबंधीतांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीतांचे विरुध्द मा. मुख्य सचिव, महसूल व वनविभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन, महाराष्ट्र शासन यांचेकडील आदेश क्र.डीएमयु/2020/सीआर.92/डीआयएसएम-1 ता. 30/09/2020 मधील Annexure III मध्ये नमूद केल्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60, व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार तसेच भारतीय साथरोग अधिनियम 1897 अन्वये दंडनीय, कायदेशीर कारवाई संबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी करावी. हा सुधारित आदेश ता. 7 ऑक्टोंबर 2020 रोजी जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com