esakal | नांदेड : तुटवड्याचे सोयाबीन बियाणे ज्यादा भावात उपलब्ध; शेतकऱ्यांच्या तक्रारी
sakal

बोलून बातमी शोधा

सोयाबीन बियाणांचा तुटवडा

नांदेड : तुटवड्याचे सोयाबीन बियाणे ज्यादा भावात उपलब्ध; शेतकऱ्यांच्या तक्रारी

sakal_logo
By
शशिकांत धानोरकर

तामसा ( जिल्हा नांदेड ) : तामसा परिसरात सोयाबीनचा तुटवडा वाढला असताना जादा भावाने सोयाबीन बियाणे विक्री होत असल्याच्या शेतकऱ्यांकडून तक्रारी आहेत. परिसरात सोयाबीन पेरणीची तयारी वाढत असून बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची अक्षर: शा परवड होत आहे. लवकरच समाधानकारक व पेरणीयोग्य पाऊस होणाच्या आशा शेतकर्‍यांना आहेत. पण सोयाबीन बियाणे उपलब्ध करताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ होत आहे.

जास्त शेती असणाऱ्या शेतकऱ्यांनी मे महिन्यात सोयाबीन बियाणांची बऱ्यापैकी उपलब्धता केली आहे. अनेकांनी सोयाबीन बियाणांची संभाव्य टंचाई लक्षात घेऊन घरगुती बियाण्याची साठवण केली आहे. पण अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी मात्र आता सोयाबीन बियाणे खरेदी करताना परेशान होत आहेत. तामसा येथील बाजारपेठेत खरेदीसाठी तीन- चार दिवस खेटे घालावे लागूनही सोयाबीन बियाण्यांची खरेदी होत नसल्याने संबंधित शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पण बाजारपेठेत सोयाबीन बियाणांचा तुटवडा दाखवून जादा भावाने संबंधातील व गुपचूप खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र बियाणे उपलब्ध होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.

हेही वाचा - 'युव्ही- रक्षक'द्वारे विषाणू नष्ट करण्याचा यशस्वी प्रयोग; नांदेडचे सुमित बंडेवार यांची निर्मिती

शेतकरी ज्या सोयाबीन बियाणांची मागणी करीत आहे ते नसल्याचे उत्तर मिळत असून इतर उपलब्ध असलेले इतर बियाणे खरेदी करण्यास सध्यातरी टाळत आहे. शासनाकडून दरवर्षी शेतकऱ्यांना मोफत व अनुदानाचे बियाणे मिळत असल्याने बऱ्यापैकी फायदा होत असत. पण यावर्षी शासनाने मोफत बियाणे बंद करुन अनुदानित बियाणांच्या बाबतीतही हात आखडता घेतला आहे. यावर्षी लॉटरी पद्धतीने सोयाबीन व तूरीचे अनुदानित बियाणे शेतकऱ्यांना देण्याचे शासनाने घोषित केले. हदगाव तालुक्यातील केवळ अंदाजे साडेसातशे शेतकरीच लॉटरी पद्धतीत नशीबवान ठरले असून उर्वरित सर्व कमनशिबी असल्याचे स्पष्ट झाले. तामसा शिवारात केवळ १८ शेतकऱ्यांना प्रत्येकी एक अशा सोयाबीन किंवा तूर यापैकी एक अनुदानित बियाणे बॅगेची लॉटरी लागली आहे. मागणी मात्र मोठी होती.

येथे क्लिक करा - दिलासादायक बातमी : नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे ५६४ रुग्ण; त्रीसुत्रीचा वापर करा- डाॅ. विपीन

शासनाने लॉटरी पद्धतीने ऑनलाइन नोंद करण्यासाठी तीन वेळा मुदतवाढ दिल्याने मोठ्या अपेक्षा होत्या. शेकडो शेतकऱ्यांनी अनुदानित सोयाबीन बियाण्यांसाठी मोठा खर्च करुन नोंद केली. पण मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या पदरी भ्रमनिराशा पडली आहे. शेतकऱ्यांसाठी सोयाबीन बियाणांचा झालेला पुरवठा व विक्री याबाबत संबंधित कृषी अधिकाऱ्यांकडून कोणतेही नियंत्रण नसल्याचे दिसत आहे. कृषी विभागाकडून भ्रमणध्वनीद्वारे सोयाबीन बियाणाबाबत हालहवाल विचारले जात असल्याच्या तक्रारी असून याच परिस्थितीचा फायदा सोयाबीन बियाणांचा तुटवडा दाखवून जादा भावाने बियाणे विक्री करीत अनेक दुकानदार मलिदा लाटत असल्याचे बोलले जाते.

चार दिवसापासून तामसा येथे मागणी केलेले सोयाबीन बियाणे खरेदीसाठी चकरा मारत आहे. पण बियाणे उपलब्ध नसल्याचे उत्तर मिळते. जादा दराने बियाणे खरेदीची ऐपत व ओळख नाही. शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे सोयाबीन बियाणे उपलब्ध करण्याबाबत शासन व कृषी दुकानदार यांच्याकडून येणाऱ्या कटू अनुभवाची याहीवर्षी पुनरावृत्ती होताना दिसते, हे शेतकऱ्यांचे दुर्देव आहे.

- जीवनराव शिंदे, शेतकरी, उमरी (जहागीर)

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image
go to top