नांदेड : कोरोनासे नही पोलिससे डर लगता है सहाब; संचारबंदीने पेटलाय गरिबाच्या भूकेचा वणवा

file photo
file photo

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : 'हाताला काम नाही, घरात छदाम नाही, खायला मारामार अन् चणचणीला दारोदार' अशी काहीशी अवस्था मोलमजुरी करणाऱ्या गरीब वर्गाची आज या कोरोना महामारीत होऊन बसली आहे. सद्ध्याच्या परिस्थितीत लेकरांचे पालनपोषण आणि त्यांच्या गरजा भागविण्यासाठी हा वर्ग हातबल होऊन बसला आहे. परत एकदा लाॅकडाऊन लागला आणि श्रीमंत- व्यापारी- शेतकरी वर्ग यांच्या दाहकतेने अंतर्बाह्य हादरला. मग सर्वसामान्य मोलमजुरी करणाऱ्या वर्गाची तर पायाखालची जमीनच सरकली. 

लाॅकडाऊन, व्यवसाय बंद, कामे बंद, मजुरी बंद. गाठीचा पैका मागील वर्षी संपलाय. वर सावकारांच्या कर्जाची परतफेड झालेली नाही. मग चालणार तरी कसं? हाच एक सवाल घेऊन कष्टकरी लाॅकडाऊन मध्ये वणवण करताना जर पोलिस कर्मचारी वर्गाच्या पुढ्यात येऊन ठेपला तर पोलिस विचारतात, क्यों रे मरना है क्या? कोरोना से डर नही लगता? त्यावर अगदीच कोलमडून पडलेला मजुर म्हणतो, "कोरोना से नही, पोलिस से डर लगता है सहाब" अंत: करण चिरणारं हे वाक्य आजच्या मजुराची अगतीकता, असहाय्यता आणि शिक्षेची अचानक भिती प्रकट व्यक्त होते.

मगील वर्षी अचानक लॉकडाउन...

मागील वर्षी अचानक आलेल्या कोरोना म्हणजेच कोव्हिड19 या विषाणूने संपूर्ण जगात काहीसे जिवघेणे वातावरण निर्माण केले आहे. यात भारतासारख्या कृषीप्रधान व कष्टकरी देशाच्या अवनतीला निश्चितच खतपाणी मिळाले नव्हे तर इथला कष्टकरी वर्ग पुरता उध्वस्त झाला आहे. दिवसभर काबाडकष्ट करुन रात्री चुल पेटणाऱ्या कुटुंबाची या परिस्थितीत काय अवस्था असेल? इथे एक एक दिवस कंठणे मुश्किल असताना जवळपास दिड वर्षांपासून  हा वर्ग कसा आपल्या पोटाची खळगी भरत असेल आणि तो किती हातबल झाला असेल हे वरील संवादातून कळेल.

आता मरणाची भीती खुंटली

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली. हातावर हातावर पोट असणाऱ्या श्रमजीवी मंडळीची सर्व कामे ठप्प या परिस्थितीला सामान्य मजूर ईतका विटला आहे की, आता मरणाची भिती खुंटत चालली आहे. त्याला आजचा दिवस जगायचाय आत्ताचा क्षण मुलांसोबत जगायचाय, पोट भरण्यासाठी त्याची पहिली पसंती म्हणणे योग्य नसेल पण ती प्रथम गरज होऊन बसली आहे. त्यासाठी आता त्याला बाहेर पडावेच लागत आहे. पोटाची आग भागविण्यास नियतीला लपंडाव करणाऱ्यांना मृत्यूचे भय कसे काय असणार? भय आहे ते बाहेर पडलो तर आरोग्य विभागाचे लोक पकडणार तर नाही ना? तपासणी करणार तर नाही ना? आणि मुख्य म्हणजे पोलिस मारणार तर नाही ना? आणि मनामध्ये एकच शंका म्हणजे पोलिस आत डांबणार तर नाही ना? बाकी काहीही आपण सहन करु पण आपल्या कुटुंबाचा विरह कुठल्याही परिस्थितीत सहन होणाऱ्या परिस्थितीत मजूरवर्ग नाही. 

माहूर तालुक्यात तगडा पोलिस बंदोबस्त

सगळी भीती बाजूला सारुन ते पोटासाठी बाहेर पडत आहेत. पण 'पोलिस' या एकाच भयाने ते पछाडले आहेत. असेच म्हणावे लागेल. पोलिस आपले काम कसोशीने करत आहेत. शेवटी ते शासनयंत्रणेशी बांधील आहेत. ते आपले कर्तव्य बजावत आहेत. पण आपल्या चिल्यापिल्यांच्या पोटाची आग विझविण्यासाठी कर्तव्य बजावताना घरधनी याच तर गोष्टीला भितोय, झुरतोय, मरतोय आणि सापडलाच कुण्या पोलिस कर्मचाऱ्यांना तर जिव मेटाकुटीला आणून म्हणतोय की, 'कोरोना से नही, पोलिस से डर लगता है सहाब' ही विदारक परिस्थिती सध्या माहूर तालुक्यात तगडा पोलिस बंदोबस्त असलेल्या सर्व ठिकाणी पाहायला मिळत आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com