Nanded : गरिबांची भाकर झाली महाग... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ज्वारी

Nanded : गरिबांची भाकर झाली महाग...

नांदेड : सध्या वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. परिणामी आता ज्वारी आणि बाजरीची भाकरही महाग झाली आहे. बहुतांश घरांमध्ये गव्हाच्या पोळ्या बनतात आणि गहू देखील महागले आहेत. हिवाळ्यात बदल म्हणून बाजरीच्या भाकरीला विशेष प्राधान्य दिले जाते. त्यामुळे भाकरी खाणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने गरिबांचे खाद्य म्हणून ओळख असलेली भाकरी आता श्रीमंत झाली आहे.

सध्या बाजारात बाजरीचा भाव वाढून तब्बल दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये प्रतिक्विंटल झाले आहेत. पूर्वी हा दर दोन हजार दोनशे ते दोन हजार चारशे रुपये होता. हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजरीला बाजारपेठेत मोठी मागणी असते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे बाजरी पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे राज्यातील विविध भागातून येणाऱ्या बाजरीचे नुकसान झाल्याचे समोर येत आहे.

बाजरी बाजारात मिळत नाही, यामुळे भाव वाढल्याचे सांगण्यात येत आहे. बाजारामध्ये राजस्थानसह नाशिक व राज्यातील इतर भागातून बाजरी येत असते. मात्र, तिचे नुकसान झाल्याने सध्या भाव वाढले आहेत. याचबरोबर हिवाळ्यात बाजरीची मागणी वाढते. अशात वाढलेली मागणी आणि कमी असलेला साठा लक्षात घेता ही भाववाढ झाली आहे.

बाजारपेठेमध्ये बाजरी आणि ज्वारी ३२ रुपये किलोने विकली जात आहे. गहू देखील ३० ते ३५ रुपये किलो झाला आहे. जुलैपासून सतत पाऊस झाल्याने पिकांचे मोठे नुकसान झाले. कडधान्याचा हंगाम आलाच नाही. यंदा सर्वाधिक फटका ज्वारी आणि बाजरीला बसला असून उत्पादन घटले आहे. बाजरीचे क्षेत्रही कमीच असल्याने उत्पादनाला मोठा फटका बसला.

ग्रामीण भागात बाजरी मिळेल का बाजरी? असे एकमेकांना विचारले जात आहे. कमतरतेमुळे प्रती क्विंटल तीन हजारावर बाजरीचे भाव पोहोचले आहे. यामुळे बाजरीला पसंत करणाऱ्यांनी बाजरी घेण्याचे प्रमाण निम्म्यावर आणले आहे. दरवर्षी मका आणि कापसाचे क्षेत्र वाढतेच आहे. नगदी पीक म्हणून याकडे पाहिले जात आहे. कमी क्षेत्रात अधिक उत्पादन काढले जात आहे. त्या तुलनेत बाजरीचे क्षेत्र आणि उत्पादनही घटले आहे. परिणामी बाजरीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्षच होते आहे. यंदा पावसानेही मोठे नुकसान केले आहे.