नांदेड : लिंगायत धर्मविरोधी काम करणाऱ्या ढोंगी साधूंवर कडक कार्यवाही करा- बसव ब्रिगेड 

प्रल्हाद कांबळे
Sunday, 3 January 2021

बाराव्या शतकात लोकशाहीचे जनक विश्व गुरु महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली. आज या लिंगायत धर्माचे भारतात जवळपास आठ कोटी अनुयायी आहेत. गेली साठ वर्षांपासून लिंगायत स्वतंत्र धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठी संघर्ष करीत आहे.

नांदेड : लिंगायत धर्मविरोधी काम करणाऱ्या ढोंगी साधूंवर कडक कार्यवाही करा. तसेच राष्ट्रीय लिंगायत समन्वयक अॅड. अविनाश भोसीकर यांच्यावर खोटे आरोप करुन दाखल केलेले गुन्हे रद्द करुन त्यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, या मागणीचे निवेदन बसव ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना देण्यात आले.

बाराव्या शतकात लोकशाहीचे जनक विश्व गुरु महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली. आज या लिंगायत धर्माचे भारतात जवळपास आठ कोटी अनुयायी आहेत. गेली साठ वर्षांपासून लिंगायत स्वतंत्र धर्माच्या संविधानिक मान्यतेसाठी संघर्ष करीत आहे. देशातील बहुतांश संघटनांना एकत्र करुन अखिल भारतीय लिंगायत समन्वयक समिती स्थापून लिंगैक्य प. पू. डॉ. शिवलिंग शिवाचार्य अहमदपूरकर महाराज व राष्ट्रीय समन्वयक अॅड. अविनाश भोसीकर यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, दिल्लीत सुमारे अठरा मोर्चे काढले. या मोर्चात लाखोंच्या संख्येने लिंगायत सहभागी झाले होते. येणाऱ्या 2021 च्या जनगणनेत लिंगायत धर्माला स्वतंत्र कॉलम देण्यात यावा, ही मागणी केली आहे. असे असताना मुखेडचे शिवाचार्य विरुपाक्ष महाराज यांनी येणाऱ्या जगगणनेत लिंगायतांनी हिंदू वीरशैव लिहावे, असे आवाहन करणारे पत्रक काढले आहे. या पत्रकावर प. पू. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा अनधिकृतपणे फोटो टाकला आहे. यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. याविषयी  अॅड. अविनाश भोसीकर हे महाराजांकडे चर्चा करण्यासाठी गेले असता त्यांच्यावरच खोटे आरोप करुन मुखेड शिवाचार्यांनी खोटे गुन्हे दाखल केले.

हेही वाचा - नांदेडला हायटेक शेती : पाचशे एकरावर होतोय कोथिंबीर उत्पादनाचा प्रयोग -

तरी प. पू. डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या फोटोचा गैरवापर केल्याप्रकरणी मुखेडचे शिवाचार्य व अन्य लोकांवर गुन्हे दाखल करावेत व या सनातनी लोकांकडून जिवीतास धोका असल्यामुळे अॅड. अविनाश भोसीकर यांना पोलिस संरक्षण देण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर अॅड. अविनाश भोसीकर, प्रा. आनंद कर्णे, प्रा. डॉ. राजू सोनसळे, डॉ. व्यंकट कुऱ्हाडे, प्रा.डॉ. माधव मोरे, पिंटूअप्पा बोंबले, अॅड. यशोनील मोगले, कॉ. गंगाधर गायकवाड, सूरज शेटे, हनुमंत कंधारकर, श्याम नायगावे, राजूअप्पा बोंबले, संदीप विश्वासराव, सचिन बोंबले, परमेश्वर लालमे, कृष्णा पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Strict action against hypocritical monks working against Lingayat religion: Basav Brigade nanded news