esakal | नांदेड हादरलं: शहरात 3 दुकानांवर गोळीबार, हल्ला करणारे ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

एका व्यापाऱ्याला लुटले... पानठेलाचालक फायरिंगमध्ये जखमी... विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळीसह पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांची घटना स्थळाला भेट..

नांदेड हादरलं: शहरात 3 दुकानांवर गोळीबार, हल्ला करणारे ताब्यात

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जुना मोंढा परिसरातील महाराजा रणजीतसिंह मार्केटमधील विजयलक्ष्मी टेक्स्टाईल या होजिअरी दुकानासह शेजारील अन्य तीन दुकानावर दुचाकीवरून आलेल्या हेल्मेटधारी आरोपींनी गोळीबार केला होता. या गोळीबारात सुदैवाने जीवित हानी झाली नसून दुकानाच्या शेजारी असलेल्या एक पानठेला चालक जखमी झाला आहे. ही घटना रविवारी (ता. चार) ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली होती . गोळीबाराच्या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांनी भेट दिल्यानंतर स्थानिक गुन्हेशाखेने रात्रीच तीन संशयीत हल्लेखोराना ताब्यात घेतले आहे. 

पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की जुना मोंढा भागात नव्याने बांधकाम करण्यात आलेल्या महानगरपालिकेच्या महाराजा रणजीतसिंह मार्केटमध्ये विजयलक्ष्मी ही होजिअरी दुकान आहे. दुकान मालक विजय धनवानी हे बसले असता रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या हेल्मेटधारी हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला होता. परंतु या गोळीबारमध्ये विजय धनवानी बालंबाल बचावले. मात्र त्यांच्या दुकानातून  १० हजार रुपये हल्लेखोरांनी जबरीने लंपास केले होते. या गोळीबारात दुकान शेजारी बसलेला पानठेला चालक आकाशसिंह परिहार जखमी झाला. त्याच्या शासकिय रुग्णालयात उपचार सुर आहे. 

हेही वाचानांदेड- जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे तिनतेरा, तरीही श्रेयवादाचे राजकारण संपेना

व्यापाऱ्यांनी भीतीपायी आपली दुकाने बंद

पोलिसांनी घटनास्थळावरून तीन फायरिंग केलेल्या गोळ्यांचे कवच जप्त केले आहेत. घटनेची माहिती मिळताच जुना मोंढा भागातील अनेक व्यापाऱ्यांनी भीतीपायी आपली दुकाने बंद केली होती. घटनास्थळाला पोलिसांनी तात्काळ भेट देऊन हल्लेखोरांचा शोध सुरू केला. 

संशयावरुन तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, इतवारा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे, वजिराबाद पोलिस ठाण्याचे संदीप शिवले यांच्यासह आदी पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवली. दुकानासमोरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे हल्लेखोर कैद झाले असून डोक्यावर हेल्मेट असल्याने त्यांची ओळख पटणे अवघड होते. मात्र संशयावरुन तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.