नांदेड - जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे तिनतेरा, तरीही श्रेयवादाचे राजकारण संपेना

शिवचरण वावळे
Sunday, 4 October 2020

कोरोनाचा आकडा कमी करणे, कोरोना चाचण्या वेळेवर होणे व वाढता मृत्यूदर कमी करण्याकडे लक्ष देण्याऐवजी केवळ नवीन रुग्णालयास मंजुरी मिळाली की, श्रेयवादासासाठी पुढे येणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्‍न सुज्ञ नांदेडकरांना पडला आहे.

नांदेड ः जिल्ह्यातील शासकीय, प्राथमिक, उपजिल्हा रुग्णालयांची स्थिती नाजुक आहे. परिणामी आरोग्य यंत्रणेवरचा ताण दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. खाटांची समस्या, कोरोना चाचणी किटचा तुटवडा, रेमेडिसिवर इंजेक्शनाची कमतरता, दोन - दोन लॅब असताना चाचणी अहवाल येण्यास होणारा विलंब, जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा वाढता मृत्यूदर अशा अनेक समस्या आज निर्माण झालेल्या आहेत. मात्र, याकडे दुर्लक्ष करत लोकप्रतिनिधींचे श्रेयवादाचे राजकारण काही संपेना.

जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. जिल्ह्यातील प्राथमिक व उपजिल्हा रुग्णालयाची स्थिती फारशी समाधानकारक नाही. अनेक ठिकाणी रुग्णालय असुनही सुविधांची वानवा आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचारासाठी जिल्हा गाठावा लागतो. त्यामुळे सहाजिकच लहान मोठ्या गावातून प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी होत आहे. आरोग्य विभागाकडून देखील तत्पर्तेने आराखडा तयार करुन तो वरिष्ठांकडे पाठवण्यासाठीच्या हालचालिंना वेग आला आहे. काही गावांमध्ये नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले. मंजूर झालेल्या या प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्राचे श्रेय घेण्यासाठी राजकीय पुढाऱ्यांनी मात्र कंबर कसल्याचे वास्तव बघायला मिळत आहे. 
 
हेही वाचा- गुड न्यूज : मराठवाड्यातून तीन रेल्वे धावणार प्रवाशांना दिलासा ​

रुग्णालयावरील ताण कमी करण्याचा लोकप्रतिनिधींना विसर?

जिल्ह्यातील विष्णुपुरी येथील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय, श्री गुरु गोविंद सिंह स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालय, शासकीय आयुर्वेदिक रुग्णालय यासोबतच जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीमध्ये कोरोनासाठी अतिरिक्त खाटा मंजूर करून घेण्यात आल्या आहेत.  कोरोनाचे रुग्ण वाढल्याने महापालिकेने गुरुद्वाराचे यात्री निवास, पंजाब भवन तसेच महसूल भवन ताब्यात घेतले आहे. इतके असताना देखील कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने शेकडो रुग्णांना होम क्वॉरंटाईनमध्ये ठेवावे लागत आहे. वाढता आकडा बघता सर्वच ठिकाणी रुग्णांची गर्दी वाढल्याने व खाटांची कमतरता भासू लागल्याने शासनाने काही खाजगी रुग्णालयांना कोरोना रुग्णांसाठी खाटा आरक्षित ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.  

हेही वाचले पाहिजे- नांदेड - हाथरस प्रकरणी मंगळवारी वंचितचे मानवी साखळी आंदोलन ​

सुज्ञ नांदेडकरांना प्रश्‍न पडला 

गावखेड्यात रुग्ण वाढत असल्याने आता गावांमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची गरज भासू लागली आहे. त्यासाठी आरोग्य विभागाकडून आराखडा तयार केला जात असला, तरी त्यासाठी आमचा पक्ष किती दिवसांपासून प्रयत्नशील होता असे दाखवून श्रेय लाटण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यातील जवळपास ५६ गावांमध्ये आरोग्य उपकेंद्र व १२ गावात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्याची मागणी जुनीच आहे. दोन वर्षापासून होत असलेली ही मागणी अद्यापही पूर्ण झालेली नाही. असे असताना व कोरोनाचा आकडा कमी करणे, कोरोना चाचण्या वेळेवर होणे व वाढता मृत्यूदर कमी करण्याकडे लक्ष देण्याऐवजी केवळ नवीन रुग्णालयास मंजुरी मिळाली की, श्रेयवादासासाठी पुढे येणे हे कितपत योग्य आहे, असा प्रश्‍न सुज्ञ नांदेडकरांना पडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NANDED - Thirteen health systems in the district Yet the politics of credulity do not end Nanded News