नांदेड : मेंढका सज्जाचा तलाठी न्यायालयीन कोठडीत

प्रल्हाद कांबळे
Friday, 11 September 2020

खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार करुन सातबारा देण्यासाठी तक्रारदाराकडे तीन हजाराची लाच तलाठी रमेश गड्डपोड याने मागितली होती. त्याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

नांदेड ः खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार करुन सात बाराला देण्यासाठी अडीच हजाराची लाच घेणाऱ्या मेंढका (ता. मुदखेड, जि. नांदेड) येथील सज्जाचे तलाठी रमेश गड्डपोड (वय ३२, रा. व्यंकटेशनगर, मुदखेड) यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरूवारी (ता. दहा) अटक केली. 

खरेदी केलेल्या जमिनीचा फेरफार करुन सातबारा देण्यासाठी तक्रारदाराकडे तीन हजाराची लाच तलाठी रमेश गड्डपोड याने मागितली होती. त्याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर गुरूवारी विभागाने लावलेल्या पंचासमक्षच्या पडताळणीमध्ये तलाठी गड्डपोड यांनी तडजोडीअंती अडीच हजाराची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. मुदखेड मधील कृष्णानगर येथे तलाठी गड्डपोड यांनी त्यांच्या खासगी कार्यालयात अडीच हजाराची लाच स्विकारली. यावेळी त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी मुदखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. पुढील तपास नांदेडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे करत आहेत. तलाठी गड्डपोड याला शुक्रवारी (ता. ११) न्यायालयासमोर हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. 

हेही वाचा Video - नांदेड : युवा बागायतदाराने पानमळा शेती फुलवून उत्पन्नाने साधली प्रगती -

राष्ट्रवादी कॉंग्रेस उत्तर विधानसभा कार्यकारणी जाहीर

नांदेड - राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी नांदेड उत्तर विधानसभा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी नांदेड उत्तर विधानसभा अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी नांदेड उत्तर मतदारसंघातील असंख्य युवकांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करून घेतला होता. नांदेड शहर जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कदम यांच्या हस्ते पत्र देऊन निवडी करण्यात आल्या.

लोकहिताचे उपक्रम राबवून लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर 

यावेळी बोलताना डॉ. सुनील कदम म्हणाले की, येणाऱ्या काळामध्ये पक्ष बांधणीसाठी शहरी व ग्रामीण भागामध्ये लोकहिताचे उपक्रम राबवून लोकांच्या समस्या सोडवण्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त भर द्यावा व त्यासोबत ग्रामीण भागातील पक्षाच्या शाखा शहरी प्रभागातील शाखा उद्‌घाटन करून पक्ष मजबूत करावा, असे सांगितले. यावेळी नांदेड उत्तर विधानसभा अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांनी पक्षातील कार्यकर्ते, पदाधिकारी व जनतेच्या हिताचे प्रश्न घेऊन इथून पुढे आपल्या सर्वांची वाटचाल असेल, असे सांगितले.

येथे क्लिक करा - Video- परभणी : मराठा समाजातील आमदार, मंत्र्यांना जिल्ह्यात प्रवेश देणार नाही- संभाजी ब्रिगेड

अशी आहे कार्यकारिणी

नांदेड उत्तर विधानसभा उपाध्यक्षपदी कंटेश जोगदंड, श्रीनाथ गिरी, प्रशांत कदम, सरचिटणीसपदी सिताराम कदम, जब्बार खान इसा खान, ज्ञानेश्वर आलेगावकर, संतोष जामगे, संघटकपदी अंबादास जोगदंड, जितेंद्र काळे, शेख फारुख शेख मेहबूब, सचिवपदी शेख इर्फान शेख शेख जहर, संतोष भोजने यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. यावेळी उत्तर विधानसभा अध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष कन्हैया कदम, युवक उत्तर तालुकाध्यक्ष शंकर कदम, अर्धापूर तालुका अध्यक्ष चंद्रकांत टेकाळे, मकसूद पटेल, संकेत कल्याणकर, फेरोज पटेल आदी कार्यकर्ते उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Talathi of Mendka Sajja in judicial custody nanded news