Nanded : आदिवासी समाजातील ४१० मुलींची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded Tata Electronics Company Select 410 girls from tribal community

Nanded : आदिवासी समाजातील ४१० मुलींची निवड

नांदेड : किनवटच्या एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयामार्फत प्रकल्प संचालक तथा सहायक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांनी आदिवासी मुलींच्या नोकरी आणि शिक्षणासाठी पुढाकार घेतला. टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीशी संपर्क साधून किनवटला घेतलेल्या शिबिरात तब्बल ४१० मुलींना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे.

आदिवासी जमातीच्या विकासासाठी या कार्यालयामार्फत विविध प्रकल्प राबविले जातात. त्यात प्रामुख्याने निवासी आश्रमशाळा व मुलींच्या शिक्षणावर विशेष भर दिला गेला आहे. या मुलींना आपले बारावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर स्वत:च्या पायावर उभे राहता यावे, या दृष्टीने प्रकल्प संचालक पुजार यांनी वेगळा विचार केला. टाटा इलेक्ट्रॉनिक्स कंपनीशी संपर्क साधून या मुलींना विकासाच्या प्रवाहात घेता येईल का याची चाचपणी केली. कंपनीच्या मानव संसाधन विभागाने याला तत्काळ प्रतिसाद देत किनवट येथे आपली स्वतंत्र टिम पाठवून दोन दिवस निवड शिबीर घेतले. या शिबिरात तब्बल ४१० मुलींना नोकरीची संधी मिळाली आहे.

किनवट येथे ता. सहा व ता. सात सप्टेंबर या कालावधीत विशेष शिबिर घेतले होते. यात सहाशे मुली सहभागी झाल्या. यवतमाळ, धारणी येथील केंद्रांना कल्पना देऊन तेथील मुलींनाही निमंत्रित केले होते. त्यात ४१० मुलींची निवड केली. या सर्व मुलींना बंगळूर येथे विशेष प्रशिक्षण देऊन तेथून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या होसुर येथील टाटाच्या मोबाईल पार्टस् व इलेक्ट्रॉनिक्स विभागात रुजू केले जाणार आहे.

पालकांनी मानले आभार

तलाईगुडा पाडा येथील या मुलींपैकी एक असलेले पालक राजाराम मडावी यांनी आपल्या मुलीच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला. हा आनंद व्यक्त करतांना राजाराम व त्यांची पत्नी भाऊक झाली. आमच्या पिढ्यांनी तालुक्याबाहेर जास्त दूरचे जग कधी बघितले नाही. मात्र पुजार सरांच्या एका छोट्याशा प्रयत्नातून मुलगी बंगळूरला जाते आणि ती सुद्धा नोकरीसाठी असे सांगून आपल्या आनंद अश्रुंना वाट मोकळी करून दिली.

आदिवासी भागातील मुलींना शासनाच्या विविध योजनांमुळे शिक्षणाची संधी मिळाली. मुलींच्या पालकांनीही थोडे धैर्य दाखवून शिक्षणासाठी त्यांना बाहेर वसतीगृहात ठेवण्यास अनुमती दिली. हे जरी खरे असले तरी शिक्षण घेतल्यानंतर मुलींना जेंव्हा स्वत:च्या पायावर उभे राहण्याची संधी मिळते तेंव्हा पालकांनी वेगळा विचार न करता धैर्याने त्यांच्या सोबत उभे राहून मुलींना हिंमत द्यावी.

- भीमराव केराम, आमदार.

शासकीय कर्तव्य बजावताना वास्तविक पाहता प्रत्येकाला समाज ऋण फेडण्याची, समाजाप्रती कृतज्ञता जपण्याची संधी मिळत असते. आदिवासी प्रकल्पातील काम हे मानवी मुल्यांना, मागास असलेल्या घरांना नवा प्रकाश देणारे असते. शासनाने ज्याही काही योजना हाती घेतलेल्या आहेत त्या या घटकातील प्रत्येकांना प्रकाश वाटा दाखविणाऱ्या आहेत.

- किर्तीकिरण पुजार, आदिवासी प्रकल्प संचालक तथा सहायक जिल्हाधिकारी, किनवट.

Web Title: Nanded Tata Electronics Company Select 410 Girls From Tribal Community

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..