नांदेड : शिक्षक पात्रता परीक्षा आज ८४ केंद्रांवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

tet exam

नांदेड : शिक्षक पात्रता परीक्षा आज ८४ केंद्रांवर

नांदेड ः महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवारी (ता.२१) होत आहे. दोन सत्रात ही परीक्षा होत असून, जिल्ह्यात ८४ केंद्रावर २४ हजार ८३९ उमेदवार परीक्षा देणार आहेत.

शिक्षक भरतीसाठी आवश्यक असणारी शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात येते. ही शिक्षक पात्रता परीक्षा आज जिल्ह्यातील ८४ केंद्रांवर होत आहे. त्यासाठी नांदेड जिल्हा परिषदेने पूर्ण तयारी केली असून, झोनल अधिकारी, केंद्र संचालक व इतर अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी तथा सदस्य सचिव सविता बिरगे यांनी सविस्तर निर्देश दिले आहेत.

या परीक्षेसाठी ८४ केंद्रसंचालक, ८४ सहाय्यक परिरक्षक आणि १४ झोनल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. १४ झोनल अधिकारी हे सर्व गट शिक्षणाधिकारी आहेत. परीक्षेसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याचे वितरण शुक्रवारीच (ता.१९) करण्यात आले.

दोन सत्रांत होणार परीक्षा

शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन सत्रात होणार आहे. पहिला पेपर प्राथमिकसाठी असून सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत होणार असून ४७ केंद्रांवर १३ हजार ४५२ उमेदवार परीक्षा देणार आहेत. दुसरा पेपर उच्च प्राथमिकसाठी असून तो दुपारी दोन ते साडेचार या वेळेत होईल. ११ हजार ३८७ उमेदवार ३७ केंद्रांवर परीक्षा देतील. दोन्ही सत्र मिळून एकूण परीक्षार्थींची संख्या २४ हजार ८३९ आहे.

हेही वाचा: संसदेपर्यंत ट्रॅक्टर मार्च निघणारच; अजून मागण्या बाकी असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं

परीक्षार्थिंनी घ्यावयाची काळजी

दोन्ही सत्रातील परीक्षार्थिंनी परीक्षा वेळेच्या किमान एक तास आगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे. प्रवेश पत्रावर दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे. परीक्षा केंद्रात मोबाईल, कॅलक्युलेटर, पेजर, कॅमेरा, डिजिटल डायरी अशा प्रकारचे कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य घेवून जावू नये. परीक्षेला येताना प्रवेशपत्र व ओळखपत्र आणणे आवश्यक आहे.

"शिक्षक पात्रता परीक्षेची सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे आणि प्रवेश पत्रावरील दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे."

- सविता बिरगे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

loading image
go to top