esakal | नांदेडच्या शिक्षकास १४ लाखापायी पावणेदोन लाखाचा आॅनलाईन गंडा; गुन्हा दाखल

बोलून बातमी शोधा

file photo}

ऑनलाइन गंडा घालणाऱ्या मध्यप्रदेशच्या दोघांवर फसवणुक व माहिती तंत्रज्ञान अंतर्गत भाग्यनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. दोन) गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नांदेडच्या शिक्षकास १४ लाखापायी पावणेदोन लाखाचा आॅनलाईन गंडा; गुन्हा दाखल
sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : ई-मेलद्वारे १४ लाख रुपये जिंकल्याचे सांगून चक्क एका शिक्षकास पावणेदोन लाखाचा ऑनलाइन गंडा घालणाऱ्या मध्यप्रदेशच्या दोघांवर फसवणुक व माहिती तंत्रज्ञान अंतर्गत भाग्यनगर पोलिस ठाण्यात मंगळवारी (ता. दोन) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही फसवणुक जून २०२० मध्ये झाली होती.

नांदेड शहराच्या भाग्यनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्वागतनगर कॅनॉल रस्त्यावर राहणारे शिक्षक सोपान चांदोबा वाघमारे (वय ५०) यांना ता. २७ जून २०२० रोजी सुमारे साडेसहाच्या सुमारास एका अनोळखी मोबाईल नंबरवरुन मध्यप्रदेश येथून प्रकाश पटेल याचा भ्रमणध्वनी आला. आपण फार लक्की आहात. आपणास ईमेलद्वारे १४ लाखाची लाॅटरी लागली. हा प्रकार तुमच्या मित्रांना किंवा घरच्याना सांगु नका. ते तुम्हाला धोका देतील असे समजावून सांगितले. सोपान वाघमारे यांना त्यांनी विश्वासात घेतले. यासाठी त्यांना साडेसहा हजार रुपये भरण्याचे सांगितले. श्री. वाघमारे यांनी पेटीएमद्वारे अगोदर चार हजार व नंतर अडीच हजार असे साडेसहा हजार रुपये त्यांनी सांगितलेल्या बँक खात्यावर पाठवले.

त्यानंतर पुन्हा प्रकाश पटेल याचा मित्र राजकुमार श्रीवास्तव याचा फोन आला. १४ लाख रुपये डाॅलरमध्ये असल्याने ते रुपयात करण्यासाठी पुन्हा १८ हजार ६०० रुपये व पुन्हा वेगवेगळे कारण सांगून एक लाख ७६ हजार रुपये जमा केले. त्यानंतर परत एक दमडीही आली नाही. शेवटी सोपान क्षिरसागर यांने त्यांच्याशी संपर्क साधला. सुरवातीला पैसे मिळतील असे म्हणून काही दिवस घालविले. मात्र पैसे काही मिळाले नाही. आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी भाग्यनगर पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला.

शेवटी भाग्यनगर पोलिस निरीक्षक अभिमन्यू सोळंके यांनी चौकशी करुन सोपान वाघमारे यांच्या फिर्यादीवरुन विविध कलमाद्वारे मध्यप्रदेशमधील प्रकाश पटेल व राजुकमार श्रीवास्तव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरीक्षक श्री. सोळंके करत आहेत. या प्रकरणचा शोध सायबर सेल घेत असल्याचे फौजदार अनिता चव्हाण यांनी सांगितले.