
मालेगावच्या ओमेश पांचाळ या बहाद्दर शिक्षकांने केला 'वजीर' सुळका सर
मालेगाव ( ता. अर्धापूर जि. नांदेड) : उंच- उंच टेकड्या, घनदाट जंगल आणि त्या मधोमध असलेला 90 अंशातील सरळ सुळका. कोणाच्याही अंगावर शहारे येतील अशीच ही जागा. ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात माहुली किल्ला आहे. याच परिसरात असलेला २५० फूट उंच असलेला वजीर सुळका प्रस्ततारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. तरीही प्रत्येक गिर्यारोहकाला हा सुळका खुणावत असतो. त्याच्या पायथ्याशी पोहोचण्यासाठी वांद्रे गावातून तीन तासांची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी वाट, दोन्ही बाजूस खोल दरी, पाठीवर अवजड ओझं घेऊन चालताना जरा जरी पाऊल घसरला तर थेट मृत्यूशी गाठ असते. त्यामूळे सुळक्याच्या पायथ्यापर्यंत यायलासुद्धा हिंमत आणि जिगर लागते.
या परिसरात पाण्याची प्रचंड कमतरता आहे. नंदिकेश्वराच्या मंदिरापासून निघाल्यानंतर कुठेही पाणी उपलब्ध नाही आणि त्यानंतर वजीर सुळक्याची 250 फूटांची 90 अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई करावी लागते. शारिरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पाहणारी मोहीम म्हणून या वजीर मोहीमेकडे पाहिल्या जाते. सुळक्याच्या पूर्वेकडील दरीचा उतार 600 फुट 90 अंशामध्ये सरळ ऊभा असल्याने चढाईस अत्यंत कठीण आहे. ही जागा पाहूनच जिथं सर्वसामान्यांच्या काळजाचा ठोका चुकतो तिथं या वजीर सुळक्याची चढाई करणं याची कल्पनाही मनात धडकी भरवणारी. अत्यंत कठीण अशी खडी चढाई असलेला वजीर म्हणजे गिर्यारोहकांसाठी एक मोठं आव्हानच असत.
महाराष्ट्राच्या गिर्यारोहण क्षेत्रातील वजीरच असलेला हा वजीर सुळका सर करण्याचे ध्येय उराशी बाळगून ओमेश पांचाळ आणि लक्ष्मण मदने हे दोन शिक्षक गिर्यारोहक नांदेडहून रवाना झाले. जिद्द, चिकाटी आणि साहस याच्या जोरावर त्यांनी २६ जानेवारीच्या मुहूर्तावर हा सुळका यशस्वीरित्या सर केला व सुळक्याच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर राष्ट्रगीत गाऊन आगळा वेगळा प्रजासत्ताक दिन साजरा केला. या कामगिरीबद्दल या शिक्षकद्वयींचे नांदेडकरांकडून कौतुक केल्या जात आहे.
मालेगाव येथील शिक्षक ओमेश पांचाळ यांनी याअगोदरही कळसूबाई, नाणेघाट, हरिश्चंद्रगड, हरिहरगड, अलंग-मदन-कुलंग असे सह्याद्रीतील अनेक दुर्गम गडकिल्ले सर केले आहेत. तसेच हिमालयातही स्टोक कांगरी, रुपकुंड, रेनोक पीक, एव्हरेस्ट बेस कॅम्प अशा अनेक मोहिमा पूर्ण केल्या आहेत.
संपादन- प्रल्हाद कांबळे