नांदेड : आठ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस देणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

st worker

नांदेड : आठ कर्मचाऱ्यांना सेवा समाप्तीची नोटीस देणार

नांदेड ः राज्य शासनमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर अद्याप कोणताही तोडगा निघाला नाही. दरम्यान, शासनाने रोजंदारीवर सेवा देणाऱ्या दोन हजार २९६ कर्मचान्यांना सेवा समाप्तीच्या नोटीसा बजावल्या आहेत. त्याअनुषंगाने नांदेड विभागात आठ कर्मचाऱ्यांना २४ तासाच्या आत कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले असून या निर्देशाचे पालन केले नाही तर त्यांना सेवा समाप्तीच्या नोटीसा बजावण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, या मागणीसाठी एसटी महामंडळाच्या विविध संघटनांनी एकत्र येत कृती समिती स्थापन करुन मागील १५ दिवसापासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे. या संपामुळे एसटी महामंडळ नांदेड विभागाचे सुमारे १० ते १२ कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले असल्याचे सांगण्यात आले आहे. संपा दरम्यान नांदेड विभागातील आत्तापर्यंत ६२ कर्मचाऱ्यांना निलंबीत करण्यात आले आहे.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

दरम्यान, रोजंदारीवरील दोन हजार २९६ कर्मचाऱ्यांना नोटीसा बजाविण्यात आल्या असून या कर्मचाऱ्यांनी २४ तासात कामावर हजर व्हावे, अन्यथा कोणतीही पूर्वसुचना न देता सेवा समाप्त करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. यात नांदेड विभागातील आठ कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्देशाचे पालन न केल्यास त्यांना नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे विभागीय वाहतूक विभागाच्या वतीने माहिती देण्यात आली आहे.

एकही बस धावली नाही

राज्य शासनाने कोणताही तोडगा काढला नसल्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडीत काढण्यासाठी हालचाली सुरु झाल्या असून राज्यातील काही कर्मचारी कामावर परतले असल्याचे दिसून येत आहे. परंतु, नांदेड विभागातील एकही एसटी कर्मचारी अद्याप कामावर रुजू झाला नाही. त्यामुळे सध्या तरी नांदेड विभागातून एकही बस धावलेली नाही.

loading image
go to top