नांदेड : सलग दोन वेळा एकच दुकान फोडणारा चोरटा कोठडीत

प्रल्हाद कांबळे
Saturday, 8 August 2020

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी शुक्रवारी (ता. सात) दुपारी केली. चोरट्याच्या घरातून ५२ हजाराचे रेडीमेड कपडे जप्त केले. त्याला वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन केले. 

नांदेड : शहराच्या वजिराबाद परिसरात असलेले एक दुकान दोन दिवसात सतत फोडून आतील किंमती कपडे चोरणारा चोरटा पोलिसांच्‍या जाळ्यात अडकला. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानी शुक्रवारी (ता. सात) दुपारी केली. चोरट्याच्या घरातून ५२ हजाराचे रेडीमेड कपडे जप्त केले. त्याला वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन केले. 

शहराच्या वजिराबादमधील खंडेलवाल प्लाझा येथील पार्थ कलेक्शन रेडीमेड दुकान चोरट्यांनी शटरचे कुलुप तोडून फोडले. ता. तीन आॅगस्ट व ता. चार आॅगस्ट या सलग  दोन दिवस फोडले. दुकानातील रेडीमेड, शर्टस, जीन्स आणि लहान मुलांचे कपडे असा ६२ हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणाची तक्रार मनोजकुमार शेषराव जगदंबे यांनी वजिराबाद पोलिस ठाण्यात दिली. यावरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाकल केला. 

सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोरटे कैद 

वजिराबाद पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर दुकानासमोर लावलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोरटे कैद झाले. यानंतर वजिराबाद पोलिसांसह समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही करत होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक पांडूरंग भारती यांच्या पथकाला शहरात गस्त घालण्यास सांगितले. यावरुन श्री. भारती यांनी आपले सहकारी सहाय्यक फौजदार अब्दुल रब, जसवंतसिंग शाहु, हवालदार मारोती तेलंगे, दशरथ जांभळीकर, तानाजी येळगे, मोतीराम पवार, राजू पुल्लेवार, बजरंग बोडखे यांना सोबत घेऊन वजिराबादमध्ये गस्त सुरु केली. 

हेही वाचा - गणेशोत्सवात स्वयंशिस्तीला प्राधान्य द्या- जिल्हाधिकारी डॉ. विपीन

५२ हजार १७८ रुपयाचा मुद्दमाल जप्त

त्यांना मिळालेल्या माहितीनुसार सदरची चोरी ही शेरासिंग शाहू याने केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून दिसुन आले. यावेळी त्याच्या मागावर हे पथक कार्यरत झाले. शेरासिंग शाहु हा गुरुद्वारा गेट क्रमांक तीनसमोर उभा असल्याचे समजले. त्यानंतर श्री. भारती यांनी त्या ठिकाणी सापळा लावून शेरासिंग शाहू याला ताब्यात घेतले. त्याला विचारपूस केली असता तो उडवा-उडवीचे उत्तरे देत होता. मात्र पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने एका अन्य साथीदारासह हे दुकान फोडल्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याच्या घराची झडती घतली असता घरातून वेगवेगळ्या रंगाच्या २२ जीन्स, १७ विविध कंपनीचे शर्ट आणि कीड्स पार्टी वेअर दोन ड्रेस असा एकूण ५२ हजार १७८ रुपयाचा मुद्दमाल जप्त केला. 

न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठविले 

त्याच्यावर वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्याला पुढील तपासासाठी वजिराबाद पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याच्याकडून अजून काही घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पथकाचे पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, विजय पवार आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी कौतुक केले. वजिराबाद पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पोलिस कोठडीत पाठविले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: A thief who broke into a shop twice in a row is in custudy nanded news