नांदेड : कृष्णूर धान्य घोटाळ्यातील तिघांना अटक- सीआयडीची कारवाई, संतोष वेणीकर फरारच 

प्रल्हाद कांबळे
Monday, 21 December 2020

सोमवारी (ता. २०) दुपारी राज्य गुन्हे अन्वेशन विभाग (सीआयडी) चे पोलिस उपाधीक्षक मच्छींद्र खाडे यांनी अटक केली. या तिघांचीही कसून चौकशी सुरु असून लवकरच यातील फरार आरोपी तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर याला अटक करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

नांदेड : संबंध राज्यभर गाजलेल्या नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील शासकिय धान्य घोटाळ्यातील भुमीगत असलेल्या तिघांना अखेर सोमवारी (ता. २०) दुपारी राज्य गुन्हे अन्वेशन विभाग (सीआयडी) चे पोलिस उपाधीक्षक मच्छींद्र खाडे यांनी अटक केली. या तिघांचीही कसून चौकशी सुरु असून लवकरच यातील फरार आरोपी तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर याला अटक करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

नायगाव तालुक्यातील कृष्णूर येथील सरकारी धान्य घोटाळा प्रकरणात आरोपी असलेल्या तिघांना राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस उपाधीक्षक मच्छिंद्र खाडे यांनी अटक केली आहे. कृष्णूर येथील इंडिया मेगा ऍग्रो कंपनीतील गैरकायदेशीर उघड झाल्यानंतर तत्कालीन पोलिस अधीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी ता. १८ जूलै २०१८ रोजी कारवाई करुन सरकारी धान्य भरलेले अकरा ट्रक पकडले होते. या प्रकरणी कुंटुर पोलिस ठाण्यात कंपनी चालकासह १९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुरवातीला हा तपास तत्कालीन सहाय्यक पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी केला. त्यांच्या तपासाबद्दल खुद्द पुरवठा मंत्र्यांनी त्यांचे कौतुक केले होते. मात्र दरम्यानच्या काळात हा तपास राज्य गुन्हे अन्वेशन विभागाकडे वर्ग करण्यात आला. 

हेही वाचा - संतापजनक घटना : शेतकऱ्यास आत्महत्येचा सल्ला देणाऱ्या मुजोर बँक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल -

या प्रकरणात आरोपींना अटक करण्यात यावी म्हणून एकाने मुंबई खंडपीठाच्या औरंगाबाद उच्च न्यायालयात याचीका दाखल केली. यांतर न्यायालयाने सीआयडीचे कान टोचताच काही दिवसात मुख्य आरोपीसह अनेकजणांना अटक करण्यात आले. कंपनी मालक अजय बाहेती, व्यवस्थापक ओमप्रकाश तापडीया, पुरवठा कंत्राटदार राजू पारसेवार, हिंगोलीचा ललीत खुराणा, पुरवठा विभागाचा रमेश भोसले, रत्नाकर ठाकूर, श्री. विप्लव, कपील गुप्ता आणि श्री. शिंदे यांना अटक केली. हे सर्वजण नांदेडनंतर हर्सुल कारागृहात मुक्कामी होते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उच्चन्यायालयाने या सर्वाना सश्र्त अटीवर जामीन दिला. हे सर्व जण सध्या जामीनावर बाहेर आहेत.

या प्रकरणात असलेला तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर हा अजूनही फरार आहे. याच गुन्ह्यात आरोपी असलेले कपील विजयकुमार पोक्रणा (वय ३५) रा. नवा मोंढा, नांदेड, दयानंद बजरंग आहीर (वय ५०) रा. गवळीपूरा, नांदेड आणि कळमनुरी (जिल्हा हिंगोली) तहसिल कार्यालयातील अव्वल कारकून पांडूरंग बाबूराव राठोड (वय ४७) रा. खुराणा काॅलणी हिंगोली या तिघांना अटक केली आहे. सीआयडीच्या पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक मच्छिंद्र खाडे यांच्या पथकाने वरील तिघांना अटक केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Three arrested in Krishnur grain scam: CID action, Santosh Venikar absconding nanded news