नांदेड : सराफा व्यापाऱ्यावर हल्ला करुन तीन लाखाचे दागिणे लुटले

प्रल्हाद कांबळे
Monday, 21 September 2020

नांदेड शहरातील सराफा बाजारात राहणारे गणेश सुधाकर बोकन यांचे मारतळा (ता. लोहा) येथे सराफा दुकान आहे. ते दररोज आपले दुकान उघडण्यासाठी दररोज मारतळा येथे ये- जा करतात. ते दिवसभर आपले दुकान चालवून शनिवारी (ता. १९) सायंकाळी सहाच्या सुमारास बंद करुन ते आपल्या दुचाकीवरुन नेहमीप्रमाणे नांदेडकडे निघाले.

नांदेड : मारतळा ते नांदेड असा दुचाकीवरुन प्रवास करणाऱ्या एका सराफा व्यापाऱ्यास पाठलाग करणाऱ्या अनोळखी तिघांनी रस्त्यात अडविले. यानंतर एकाने सराफावर तलवारीने हल्ला करुन जखमी करुन त्यांच्याकडे असलेल्या तीन लाखाच्या सोन्याच्या दागिण्याची बॅग लंपास केली. हा प्रकार भायेगाव शिवारात शनिवारी (ता. १९) रात्री घडली.

नांदेड शहरातील सराफा बाजारात राहणारे गणेश सुधाकर बोकन यांचे मारतळा (ता. लोहा) येथे सराफा दुकान आहे. ते दररोज आपले दुकान उघडण्यासाठी दररोज मारतळा येथे ये- जा करतात. ते दिवसभर आपले दुकान चालवून शनिवारी (ता. १९) सायंकाळी सहाच्या सुमारास बंद करुन ते आपल्या दुचाकीवरुन नेहमीप्रमाणे नांदेडकडे निघाले. यावेळी त्यांनी दुकानातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिणे असा तीन लाख पाच हजार रुपये ऐवज असलेली बॅग सोबत घेतली. 

हेही वाचा जायकवाडी प्रकल्पाचे पाणी विष्णुपुरीत, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा -

तीन लाखाची बॅग जबरीने हिसकावून घेऊन पसार 

नांदेडला येत असताना त्यांचा मारतळा येथूनच एका दुचाकीवरुन अनोळखी तीन चोरटे पाठलाग करत होते. श्री. बोकन हे भायेगाव शिवारात येताच रस्ता निर्मनुष्य असल्याने त्यांना अडविले. तिघांपैकी एका चोरट्याने तलवारीने श्री. बोकन यांच्यावर हल्ला केला. मात्र तलवारीचा घाव चुकविल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र यात बोकन यांच्या हाताला जबर दुखापत झाली. त्यांच्याकडे असलेली तीन लाखाची बॅग जबरीने हिसकावून घेऊन पसार झाले. 

नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात अनोळखी तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा 

जखमी अवस्थेत सराफा श्री. बोकन यांनी नांदेड ग्रामिण पोलिस ठाणे गाठले. घडलेला प्रकार त्यांनी पोलिसांना सांगितला. यानंतर जखमीला रुग्णालयात पाठवून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. गणेश बोकन यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात अनोळखी तिघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. कासले करत आहेत. पोलिसांनी तिन संशयितांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले. 

येथे क्लिक करा -  हजरत सांगडे सुलतान दर्गाचा उरूस रद्द

अर्धापूर ते आसना नदीवर असाच घडला होता प्रकार

अर्धापूर येथून सरापा व्यापारी नांदेडकडे येत असतांना त्याला आसना बायपासजवळ अडवून त्याच्या डोळ्यात तिखट टाकून लाखोंचा ऐवज असलेली बॅग लंपास केली होती. या प्रकरणातील आरोपींचा शोध अद्याप अर्धापूर पोलिसांना लागला नाही. त्यानंतर पुन्हा एका दुसऱ्या सराफा व्यापाऱ्याची लूट करण्यात आली होती. जिल्ह्यात सराफा व्यापाऱ्यास लुटण्याच्या घटना घडत असल्याने व्यापारी वर्गात भितीचे वातावरण पसरले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Three lakh jewelery looted after attack on bullion trader nanded news