
नांदेड तालुक्यातील वाजेगाव सर्कलसह इतर गावच्या शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक करणारा व्यापारी दत्तात्रय काचावार हा गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून तो पसार असून फसवणूक झालेल्या अशा जवळपास ७० शेतकऱ्यांनी पोलिसांकडे जवाब नोंदविल्याची माहिती पुढे आली आहे.
नांदेड : जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांकडून शेतमाल घेऊन त्या मालाचे पैसे परत न करता लाखोंचा गंडा घालणाऱ्या व्यापाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल होताच तो पसार झाला. तीन दिवस उजाडून गेले तरी अजून तो पोलिसांच्या तावडीत सापडला नाही. मात्र या प्रकरणातील त्याचे काहीनातेवाईक सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
नांदेड तालुक्यातील वाजेगाव सर्कलसह इतर गावच्या शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक करणारा व्यापारी दत्तात्रय काचावार हा गुन्हा दाखल झाला. तेव्हापासून तो पसार असून फसवणूक झालेल्या अशा जवळपास ७० शेतकऱ्यांनी पोलिसांकडे जवाब नोंदविल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. दत्तात्रय काचावार पोलिसांना सापडत नसल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांमधून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. दरम्यान फसवणुकीच्या गुन्ह्यात यापूर्वी अटक करण्यात आलेल्या आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
हेही वाचा - नांदेड : विकेल ते पिकेल धोरणांतर्गत विविध योजनांचा लाभ घ्यावा- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन -
शेतकऱ्यांच्या फसवणूकप्रकरणी वाजेगाव येथील व्यापारी दत्तात्रय काचावार यांच्यासह दिगंबर काचवार, अक्षय काचावार, अंकुश काचावार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दत्तात्रय काचावर व त्यांचा मुलगा पसार झाले. या गुन्ह्यातील दिगंबर काचावार तसेच शिवम ट्रेडर्सचे बालाजी अंकुष काचावार यांना पोलिसांनी अटक केली. पोलिस कोठडी संपल्यानंतर उपरोक्त आरोपींची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा चुना लावून पसार झालेला दत्तात्रय काचावार अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसल्याने शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान ज्या शेतकऱ्यांची फसवणूक झाली अशा शेतकऱ्यांनी तक्रार दाखल करण्याचे आवाहन पोलिसांनी केल्यानंतर जवळपास ७० शेतकऱ्यांच्या पोलिसांनी नोंदी घेतल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी सदर गंभीर प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे.