esakal | नांदेड : विष्णुपुरीचे बारा दरवाजे उघडले; हजारो हेक्‍टर पिके पाण्याखाली
sakal

बोलून बातमी शोधा

nanded

नांदेड : विष्णुपुरीचे बारा दरवाजे उघडले; हजारो हेक्‍टर पिके पाण्याखाली

sakal_logo
By
अभय कुळकजाईकर

नांदेड : शहर आणि जिल्ह्यात सोमवारी (ता. सहा) दुपारनंतर कमी अधिक प्रमाणात सर्वत्र पाऊस सुरू झाला. काही ठिकाणी झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वच लहान - मोठ्या नदी, नाले, ओढे यांना पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्याचबरोबर हजारो हेक्टरवरील पिके पाण्याखाली गेली आहेत. पावसाचे प्रमाण अधिक असल्यामुळे यात रस्त्यांसह घरांचेही नुकसान झाल्याची माहिती आहे. मंगळवारी सकाळी जिल्ह्यात साडेदहा वाजेपर्यंत सरासरी ६२.२० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील सहा तालुक्यासह २८ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.

गेल्या तीन चार दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात सर्वत्र पाऊस सुरू झाला. सोमवारी दुपारनंतर पावसाचा जोर वाढला आहे. नांदेड शहर आणि परिसरातही सोमवारी तसेच मंगळवारी (ता. सात) देखील जोरदार पाऊस झाला आहे.

crops

crops

गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाचे मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत बारा दरवाजे उघडण्यात आले आहे. त्यातून एक लाख ५६ हजार ३७० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीपात्रात करण्यात येत आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहत असून जुन्या नांदेडमधील नावघाट येथील संत दासगणू पूल पाण्याखाली गेला आहे. गोवर्धन घाट येथील शांतीधाम स्मशानभूमी देखील पाण्याखाली गेली आहे. मंगळवारीही कमी अधिक प्रमाणात शहर व जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.

जिल्ह्यात मंडळनिहाय पाऊस

अर्धापूर - १२८, तामसा - १२२, किनी - ११९, जलधारा - ११७, शिवणी - ११४, उमरी - १०७, पिंपरखेड - १०५, मनाठा - १०४, भोकर - १०३, गोळेगाव - १०२, मातुळ - १००, तळणी - ९७, मोघाळी - ९५, कुंडलवाडी - ८९, शिंदी - ८४, रामतीर्थ - ८३, सगरोळी - ८०, आष्टी - ७९, आदमपूर - ७६, धर्माबाद - ७६, शेवडी - ७५, बोधडी - ७४, चांडोळा - ७०, हिमायतनगर - ६८, निवघा - ६८, लोहगाव - ६७, नांदेड शहर - ६६, कुंटूर - ६५. इतर २३ मंडळात देखील ५० ते ६५ मिलीमीटर पाऊस झाला आहे.

हेही वाचा: भोकरदन: विजेचा शॉक लागून दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू

जिल्ह्यात सरासरी ६२.२० मिलिमीटरची नोंद

जिल्ह्यात सहा तालुक्यात अतिवृष्टी झाली असून त्यामध्ये भोकर - १०४.५०, उमरी - ९७.९०, हदगाव - ९०.२०, अर्धापूर - ८०.९० बिलोली - ७६, किनवट - ७२.७० या तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्यात आजपर्यंत ९०८.१० मिलिमीटरनुसार १०१ टक्के पावसाची नोंद झाल्यामुळे जिल्ह्यात पावसाने सरासरी ओलांडली आहे.

मुखेडमध्ये कार वाहून गेली

मंगळवारी अकराच्या सुमारास मुखेड - उस्माननगर रस्त्यावर मोतीनाला येथे पूर आला होता. त्यामुळे वाहतुक ठप्प होती. त्या पुरात एकाने कार नेण्याचा प्रयत्न केला पण कार वाहून गेली आहे. त्या कारमधील एकाने पुरातील झाडाचा आसरा घेतला आहे. त्याला मदत पथकाने दोरीच्या साह्याने पुरातून बाहेर काढण्यात यश मिळाले आहे. मात्र, कारमधील दोघे कारसह पुरात वाहून बेपत्ता झाले आहेत. त्यांचा शोध अद्याप सुरू आहे.

loading image
go to top