
रामतीर्थ पोलीस ठाण्यातील स्थानिक बिट जमादार गोविंद गंगाराम पवार रा. गोळेगाव ता. नायगाव व हणमंत रामराव श्रीरामे पोलीस नायक हे दोघे मिळून बिजूर येथील एका बियर शाँपी चालकाची अनेक दिवसांपासून अर्थिक पिळवणूक करत होते.
नायगाव ( जिल्हा नांदेड ) : एका बियर शाँपी चालकाकडून दोन हजाराची लाच घेतांना रामतीर्थ पोलीस ठाण्यातील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले सोमवारी (ता. ३०) होते. मंगळवारी (ता. एक) न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत पाठविले आहे.
रामतीर्थ पोलीस ठाण्यातील स्थानिक बिट जमादार गोविंद गंगाराम पवार रा. गोळेगाव ता. नायगाव व हणमंत रामराव श्रीरामे पोलीस नायक हे दोघे मिळून बिजूर येथील एका बियर शाँपी चालकाची अनेक दिवसांपासून अर्थिक पिळवणूक करत होते. यापूर्वी चिरीमिरी दिल्यानंतर जमादार पवार हे सतत त्रास देत होते त्यामुळे त्या बियर शाँपी चालकाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून याबाबत तक्रार नोंदवली. प्राप्त तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पवार आणि श्रीरामे यांच्या मुसक्या आवळण्यासाठी सापळा लावला.
तक्रारीनंतर २००० हजार रुपये ता. ३० नोव्हेंबर रोजी देण्याचे ठरले त्यानुसार सोमवारी सायंकाळच्या दरम्यान लाच घेतांना गोविंद पवार या पोलिस जमादारास रंगेहाथ पकडण्यात आले. तर या प्रकरणी लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले असल्याने पोलीस नायक हणमंत रामराव श्रीरामे हे ही जाळ्यात अडकले. जमादार पवार यांची अतिशय वादग्रस्त कारकीर्द असून स्थानिक बिटमध्ये ते अरेरावी बरोबरच मोठ्या प्रमाणात सर्वसामान्यांची अर्थिक पिळवणूक करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सदरचा सापळा यशस्वी करण्यासाठी उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राजेश पुरी, संतोष शेटटे, एकनाथ गंगातिर्थ, दर्शन यादव, गजानन राऊत यांनी प्रयत्न केले. रामतीर्थ पोलिस ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ शिंदे यांच्या चांगल्या कामाला दोन कर्मचाऱ्यांमुळे गालबोट लागले आहे.
संपादन - प्रल्हाद कांबळे