esakal | नांदेड : अपघातात दुचाकीस्वार ठार, एक जखमी; राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची पहाट
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

स्थानिकांच्या मदतीने गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला ग्रामीण रुग्णालय माहूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले.

नांदेड : अपघातात दुचाकीस्वार ठार, एक जखमी; राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची पहाट

sakal_logo
By
साजीद खान

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : वाई बाजारच्या वाघाई टेकडी ते साईनगर समाधान जाधव यांच्या शेताजवळ राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार (ता. २८) सकाळी अंदाजे नऊ वाजताच्या सुमारास दुचाकी अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. स्थानिकांच्या मदतीने गंभीर जखमी असलेल्या व्यक्तीला ग्रामीण रुग्णालय माहूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले असून जाग्यावरच गतप्राण झालेल्या व्यक्तीला शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टा येथे नेणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

अपघातासाठी प्रसिद्धी झोतात आलेल्या धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्ग डेंजर झोन बनलाय. या मार्गावर दररोज अपघातांची मालिका पाहायला मिळत असतानाच बुधवार (ता. २८) रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान वाई बाजार वाघाई टेकडी असोली (साईनगर) समाधान जाधव यांच्या शेता जवळ राष्ट्रीय महामार्गावर माहूरकडून वाई बाजारकडे येणाऱ्या (एपी-१- डी- ३२०९) या क्रमांकाची होंडा स्प्लेंडर दुचाकी येत असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रोडच्या बाजूला ढेकळात पडल्याने मोटरसायकल चालक जागेवर गतप्राण झाला. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने स्थानिकांच्या मदतीने त्यास उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय माहूर येथे पाठविण्यात आले आहे. 

घटनेतील मयत झालेल्या व्यक्तीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टा येथे पाठविणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. या अपघाताची गंभीरता एवढी होती की दुचाकीसह दोन्ही युवकाचे डोके चक्क ढेकळात खुपसले गेले होते. मयताचे व जखमीचे नाव अद्याप कळू शकले नाही. मात्र ते यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील असल्याचे व तेलंगणा राज्यातील आदिलाबाद येथे कामाला असल्याची शक्यता घटनास्थळावर चर्चिली जात होती. एकंदरीत राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असेल आतापर्यंत शेकडो जणांचे प्राण या मार्गावर गेले असून अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. परंतु बांधकाम कंत्राटदार कंपनी आपल्या बेदरकार धोरणांमध्ये बदल करायला तयार नसल्याने अद्यापपर्यंत या मार्गावर कोणतेही सूचना चिन्ह किंवा चेतावणी संदेश असलेले फलक लावण्यात आलेले नाही.

संपादन- प्रल्हाद कांबळे