नांदेड : तामसा येथे अज्ञातांनी पेट्रोल टाकून सात वाहने जाळली, शहरात खळबळ 

शशिकांत धानोरकर
Sunday, 20 December 2020

या घटनेमुळे तामसा परिसर हादरला असून मोठ्या शहरातील वाहने जाळण्याचे  लोन आता ग्रामीण भागातही पसरते का ? अशी भीती वाहनधारक व नागरिकातून व्यक्त होत आहे. 

तामसा (जिल्हा नांदेड) : तामसा (ता. हदगाव) येथील विविध भागात अज्ञात आरोपींनी घरासमोर उभ्या केलेल्या सात वाहनांवर पेट्रोल टाकून जाळल्याची खळबळजनक घटना शनिवारी (ता. १९) मध्यरात्री घडली आहे. या घटनेमुळे तामसा परिसर हादरला असून मोठ्या शहरातील वाहने जाळण्याचे  लोन आता ग्रामीण भागातही पसरते का ? अशी भीती वाहनधारक व नागरिकातून व्यक्त होत आहे. 

जुन्या शहरातील विविध भागात सिरीयल पद्धतीने मध्यरात्री अंदाजे ११ ते दोन यादरम्यान अज्ञातांनी वाहने पेट्रोल टाकून पेटविली. येथील गणेश शिंदे यांच्या घरासमोरील अपे ऑटो अज्ञातांनी पेटविला. यामुळे शिंदे यांच्या घराच्या परिसरातील नागरिक उठून त्यांनी ऑटोची आग विझवली. तोपर्यंत आॅटोचे जळून मोठे नुकसान झाले होते. याच दरम्यान त्यांच्या शेजारी नंदुकुमार कंठाळे यांची दुचाकी पेटत्या अवस्थेत आढळली. होळी गल्ली परिसरातील अशोक लाभसेटवार व किशोर मुळावकर यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दुचाकी पेटविण्यात आल्यामुळे गोंधळ व भीतीचे वातावरण पसरुन नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले व घटनास्थळी जमू लागले. राममंदिर परिसरातील राम बंडेवार, गजानन नंदकुमार बंडेवार, सय्यद बबलू यांच्या घरासमोरील दुचाकी वाहने अज्ञातांनी पेटवून दिल्याचे समजतात जुने शहर हादरले. एकापाठोपाठ एक वाहने जाळण्याच्या प्रकाराची माहिती पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर सहाय्यक पोलिस निरीक्षक नामदेव मद्दे यांनी पोलिस कर्मचाऱ्यांसह परिसरात अनेक भागात अज्ञातांची शोध मोहीम केली. पण अज्ञात आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. शहरात वाहने पेटवून देण्याची ही पहिलीच घटना आहे. दुचाकी चोरणे किंवा दुचाकीमधील इंधन चोरण्याचे प्रकार यापूर्वी घडत आले आहेत. पण वाहने जाळण्याची घटना पहिलीच असल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचाप्रेरणादायी : भोसी गावची सहकार्यातुन समृध्दीकडे वाटचाल 

वाहने जाळण्याची घटना मात्र धक्कादायक मानली जात आहे. पहाटेपासूनच जाळलेली वाहने बघण्यासाठी मोठ्या संख्येने बघ्यांची गर्दी होऊन विविध तर्कवितर्कांच्या चर्चांना उधाण आले आहे. शहरातील अनेक जण आपली वाहने घरासमोरच रात्री उभी करतात. त्यामुळे शनिवारी मध्यरात्रीच्या घटनेनंतर मात्र दुचाकीस्वारांची धाबे दणाणले आहे. पंधरवाड्यात चोरीच्या दोन घटना व दुचाकी जाळण्याचा प्रकार यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे चालू असून राजकीय पुढाऱ्यांनी मात्र जळालेले वाहने बघताना फोटोसेशन करुन फोटो व्हायरल केल्याबद्दल नागरिकातून टीकेचा सूर व्यक्त होत आहे. हौशी राजकारण्यांकडे दुचाकीस्वारांना मदतीचा विषय छेडला असता वेळ मारून नेत घटनास्थळावरून जाणे त्यांनी पसंत केले. वाहने जाळून अंदाजे साडेचार लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी तामसा पोलिसांनी नोंद केली आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: Unidentified persons threw petrol and set fire to seven vehicles at Tamsa nanded news