विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना धीर द्यावा ः मंत्री उदय सामंत

शिवचरण वावळे
Friday, 18 September 2020

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची परीक्षा ही आॅनलाईन व आॅफलाईन पद्धतीने होणार असून, परिक्षेदरम्यान सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य चाचणी होणार आहे.

 

नांदेड ः  विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय होता. यास बहुतेक विद्यापीठाने देखील संमती दर्शविली होती. मात्र ऐनवेळी युजीसीने परीक्षा होणार असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे (एमसीक्यू) बहू पर्यायी पद्धतीने परिक्षा होणार असून, कोरोना काळात घाबरलेल्या विद्यार्थ्यांना शासनासह विद्यापीठ प्रशासनाने धीर देण्याचे काम करावे, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.

मंत्री उदय सामंत शुक्रवारी (ता. १८) नांदेड दौऱ्यावर आले असता त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार बालाजी कल्याणकर, जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद बोंढारकर, उमेश मुंडे उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना मंत्री श्री. सामंत म्हणाले की, नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची परीक्षा ही आॅनलाईन व आॅफलाईन पद्धतीने होणार असून, परिक्षे दरम्यान सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य चाचणी होणार आहे. या दरम्यान पॉझिटिव्ह आढळुन आलेल्या विद्यार्थ्यांना पुढे दोन वेळेस होणाऱ्या परीक्षेला बसता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी काळजी करण्याची गरज नाही. 

हेही वाचा- Video - मराठा आरक्षणासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची अशोक चव्हाणांची ग्वाही

कंपन्यांनी विद्यार्थ्यांसोबत भेदभाव करू नये

नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांची पुढच्या दोन महिण्यात परीक्षा होणार. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत केवळ श्रेयवादासाठी कुणीही राजकारण करु नये. कोरोनाच्या संकट काळात होणाऱ्या परिक्षार्थींच्या प्रमाणपत्रावर कोविड-१९ असा कुठलाही शिक्का असणार नाही. कंपन्यांनी  विद्यार्थ्यांसोबत भेदभाव न करता नौकरीत संधी द्यावी अन्यथा त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचा इशारा देखील उदय सामंत यांनी दिला आहे.

हेही वाचले पाहिजे- प्रमोद शेवाळे नांदेडचे नवे पोलीस अधीक्षक, विजयकुमार मगर यांची बदली ​

वस्तीगृह उभारणीसाठी शासन सकारात्मक

नांदेड विद्यापीठाअंतर्गत जवळपास ४५ अपंग विद्यार्थी परीक्षा देणार असल्याने त्यांच्यासाठी विशेष सुविधा करण्यात येणार आहे.  विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थीनींसाठी प्रत्येकी शंभर कॉटचे वसतीगृह उभारण्याच्या प्रस्तावावर सरकार सकारात्मक विचार करत आहे. शंकरराव चव्हाण अभ्यास केंद्र उभारणीला बाधा येऊ नये म्हणून यावर तातडीने निर्णय घेतला जाणार असल्याचेही श्री. सामंत यांनी स्पष्ट केले. 

दादागीरी खपवून घेणार नाही
मला उशिरा का होईना नांदेडला येण्याचं शहाणपण सुचलं आहे.  तत्कालीन सरकारला तर पाच वर्षातही ते सुचलं नाही. विरोधकांनी व इतर पक्ष संघटनांनी आंदोलने जरुर करावीत, पण लोकशाही पद्धतीने करावीत. श्रेयवादासाठीची दादागीरी खपवून घेणार नाही. 
- उदय सामंत, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री (महाराष्ट्र राज्य)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nanded: University administration should give patience to students: Minister Uday Samant Nanded News