
दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत हेल्मेट सेल्फी पॉईंटची संकल्पना राबविण्यात येत आहे
नांदेड : दुचाकी चालवितांना स्वत: च्या सुरक्षिततेसाठी नागरिकांनी हेल्मेटचा वापर करावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले. दुचाकीस्वारांमध्ये हेल्मेट वापरण्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत हेल्मेट सेल्फी पॉईंटची संकल्पना राबविण्यात येत आहे. यासेल्फी पाँईटचे उद्घाटन प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. कामत यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले.
रस्ते अपघात व त्याद्वारे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी ३२ वा रस्ता सुरक्षा अभियान 2021" हे ता. 18 जानेवारी ते ता. 17 फेब्रुवारी 2021 पर्यंत जिल्ह्यातील राबविण्यात येत आहे. रस्ते वाहतुक नियमांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याप्रसंगी सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंत भोसले व राहूल जाधव, मोटार वाहन निरीक्षक पद्माकर भालेकर, कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज भरण्याचे आवाहन
नांदेड : सन 2020- 21 या शैक्षणिक वर्षात प्रवेशित असलेल्या विद्यार्थ्यांनी भारत सरकार शिष्यवृती व शिक्षण फी परीक्षा फी तसेच व्यावसायिक पाठ्यक्रमाशी संलग्न असणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता या योजनेंतर्गत शिष्यवृत्तीचे अर्ज भरण्यासाठी महाडीबीटी महाडीबीटी पोर्टल सुरु झाले आहे.
जिल्ह्यातील सर्व शासनमान्य अनुदानित, विनाअनुदानीत, कायम विनाअनुदानीत महाविद्यालयाचे प्राचार्य व महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी www.mahadbtmahait.gov.in या वेबसाईटवर शिष्यवृत्तीचे ऑनलाईन अर्ज त्वरीत व्यवस्थीत भरावेत. तसेच सन 2019- 20 या वर्षातील ज्या विद्यार्थ्यांना रीअप्लाय पर्याय आलेला असेल त्यांनी पुन्हा अर्ज करावेत, असे आवाहन समाज कल्याण सहाय्यक आयुक्त तेजस माळवदकर यांनी केले आहे.