esakal | नांदेड : विजय कबाडेंची जिल्ह्यात दुसरी इनिंग सुरु
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

. श्री. कबाडे यांना नांदेड शहर व जिल्‍ह्यातील सराईत गुन्हेगारांचा चांगला अभ्यास असून त्यांनी नांदेड शहरातील अनेकांना ताळ्यावर आणले होते. पुन्हा त्यांची जिल्ह्यात दुसरी इनिंग सुरु झाल्याने अनेक अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.  

नांदेड : विजय कबाडेंची जिल्ह्यात दुसरी इनिंग सुरु

sakal_logo
By
प्रल्हाद कांबळे

नांदेड : जिल्हा पोलिस दलात उपविभागीय पोलिस अधिकारी (शहर) म्हणून काम केलेल्या विजय कबाडे यांना महाराष्ट्र शासनाने पुन्हा पदोन्नतीवर नांदेड जिल्ह्यात पाठविले आहे. त्यांनी भोकर येथे अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदाचा पदभार विजय पवार यांच्याकडून गुरुवारी (ता. आठ) घेतला. श्री. कबाडे यांना नांदेड शहर व जिल्‍ह्यातील सराईत गुन्हेगारांचा चांगला अभ्यास असून त्यांनी नांदेड शहरातील अनेकांना ताळ्यावर आणले होते. पुन्हा त्यांची जिल्ह्यात दुसरी इनिंग सुरु झाल्याने अनेक अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहे.  

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर मागच्या आठवड्यात मुहूर्त लागला. झालेल्या बदल्यात नांदेड जिल्ह्यात पोलिस अधीक्षक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचा समावेस होता. मात्र जिल्ह्यात बदली झालेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या रिक्त जागी पद भरले नाही. परंतु भोकर अतिरिक्त पोलिस अधीक्षक पद भरले असून बदली झालेले अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या ठिकाणी बीड येथून अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे यांना पाठविण्यात आले होते. श्री. कबाडे यांनी गुरुवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात येऊन रुजु होण्याची पूर्ण प्रक्रिया पूर्ण करुन पोलिस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांना भेटून दुपारी भोकर येथे जावून विजय पवार यांच्याकडून आपल्या पदाचा पदभार घेतला. यावेळी भोकर विभागातील सर्व ठाणे प्रभारी यांची उपस्थिती होती. 

हेही वाचा सायकलप्रेमींसाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी घेतला निर्णय

गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविले होते

विजय कबाडे हे नांदेड शहरात उपविभागीय पोलिस अधिकारी असतांना त्यांनी गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविले होते. हे करत असतांना त्यांचे स्थानिक राजकिय मंडळींशीही वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते. पुढे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे उपविभागीय पोलिस अधिकारी असतांना विशेष पोलिस महानिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरु असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर कारवाई केली होती. तो अड्डा पुन्हा सुरु असल्याचे बोलल्या जात आहे. विजय कबाडे यांच्या येण्याने या भागातील अनेक गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. 

येथे क्लिक करानांदेड विभाग : गाळपासाठी २६ कारखान्यांचे ऑनलाइन अर्ज, १७ खासगी तर नऊ सहकारी

पोलिसांनी आपल्या कामात प्रामाणीक रहा 

भोकर विभागात येणाऱ्या काळात कुठलेच अवैध धंदे चालु देणार नसुन सर्वसामान्य नागरिकांना विश्‍वासात घेऊन कायदा व सुव्यवस्था हाताळण्यात येईल. गुन्हेगारांची गय केली जाणार नसुन त्यांनी आताच आपले काळे कारनामे थांबवावेत अन्यथा आपल्या विरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा दम त्यांनी पदभार स्विकारल्यानंतर पोलिस अधिकाऱ्यांच्या बैठकित दिला. तसेच काम चुकार पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही आपल्या कामात प्रामाणीक रहा असा सल्ला दिला. यावेळी विजय पवार यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने निरोप देण्यात आला. त्यांच्याकडे सध्या नांदेडचा अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी आहे.