
नांदेड : आक्षेप, हरकतींवर आज सुनावणी
नांदेड : नांदेड वाघाळा महापालिकेची येत्या आॅक्टोंबर महिन्यात मुदत संपत असल्यामुळे निवडणुकीसाठीची तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार प्रभाग रचनेचा प्रारूप आराखड्यावर एकूण ६६ आक्षेप व हरकती दाखल झाल्या आहेत. यावर सोमवारी (ता. चार जुलै) सकाळी अकरा वाजता महापालिकेत सुनावणी होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली.
नांदेड वाघाळा महापालिकेची येत्या ता. ३० आक्टोंबर रोजी मुदत संपत आहे. त्यामुळे राज्य निवडणुक आयोगाने गुगल मॅपद्वारे प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा ता. १३ जून रोजी प्रसिद्ध केला होता. सध्या महापालिकेत २० प्रभागातून ८१ सदस्य निवडून आले आहेत. आक्टोंबर २०२२ मध्ये होणाऱ्या निवडणुकीत ३१ प्रभागातून ९२ सदस्य निवडून जाणार आहेत. त्यासाठी प्रभाग रचनेचा आराखडा प्रसिद्ध करण्यात आला होता.
राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या या प्रभाग रचनेवर ता. २४ जूनपर्यंत आक्षेप व हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानुसार एकूण ५६ जणांनी ६६ आक्षेप व हरकती दाखल केल्या आहेत. या आक्षेपामध्ये काही भाग वगळणे तर काही नवे भाग जोडण्यात यावेत, यासाठीची मागणी करण्यात आली आहे. निवडणुकीची प्रक्रिया आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त डॉ. पंजाब खानसोळे, सहायक आयुक्त सुधीर इंगोले, वरिष्ठ लिपिक अख्तर इनामदार, मोहमंद युनुस, श्री. जोशी आदी पाहत आहेत.
समितीद्वारे होणार सुनावणी
राज्य निवडणुक आयोगाने जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर जे आक्षेप, हरकती घेण्यात आल्या आहेत. त्यावर सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून सुनावणी घेण्यात येणार आहे. त्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून पुणे येथील समाजकल्याण विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर समिती सदस्य म्हणून राज्य निवडणुक विभागाचे प्रतिनिधी, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त पांडुरंग कुलकर्णी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर आणि आयुक्त डॉ. सुनील लहाने यांची उपस्थिती राहणार आहे. त्यांच्या उपस्थितीत सुनावणी होणार आहे.
Web Title: Nanded Waghala Municipal Corporation Election Ward Structure
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..