esakal | नांदेड : वाई बाजार जिल्हा परिषद शाळेत चोरी; संगणक साहित्य लंपास
sakal

बोलून बातमी शोधा

वाईबाजार शाळा

नांदेड : वाई बाजार जिल्हा परिषद शाळेत चोरी; संगणक साहित्य लंपास

sakal_logo
By
साजीद खान

वाई बाजार ( जिल्हा नांदेड) : जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा वाई (Zp school waibajar) बाजार येथील स्टोअर रुममध्ये ठेवण्यात आलेले संगणक संच, प्रिंटर आदी साहित्य ( ता. १७ ते १८ ) मेच्या रात्री चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मुख्याध्यापकाच्या तक्रारीवरुन सिंदखेड पोलिस ठाण्यात (shindkhed police station) अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर संगणक साहित्य मागील मुख्याध्यापक निलंबन प्रकरणातील महत्त्वपूर्ण मुद्देमाल असल्याने या घटनेमुळे उलट सुलट चर्चेला पेव फुटले आहे.

गत काही महिन्यापूर्वी जिल्हा परिषद शाळेच्या तत्कालीन मुख्याध्यापकावर आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. सदर कारवाईमुळे वाई बाजार जिल्हा परिषद शाळा चांगलीच चर्चेत आली होती. प्रकरणाच्या चौकशीचा फार्स पूर्ण झाल्यानंतर सदरील निलंबीत मुख्याध्यापकाला पुनश्च पदस्थापना मिळणार असल्याच्या पार्श्वभूमीवर (ता. १७ व १८) रात्री शाळेतील स्टोअर रूममध्ये सुरक्षित रित्या ठेवण्यात आलेले संगणक संच व प्रिंटर आदी ३८ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरीला गेल्याची बाब (ता.१८) रोजी सकाळी मुख्याध्यापकांच्या निदर्शनास आली.

हेही वाचा - कोरोनामुळे मृत व्यक्तीवर उपचार सुरु असल्याचा बनाव; मयताच्या पत्नीने न्यायालयात घेतली होती धाव, अखेर रुग्णालयावर फसवणुकीसह आदी कलमान्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी वरिष्ठ कार्यालयाच्या आदेशावरून वाई बाजार जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक बंडू दौलतराव ईश्वरकर यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरांविरुद्ध सिंदखेड पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. एकंदरीत या प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता वाई बाजार जिल्हा परिषद शाळेत काही महिन्यापूर्वी तत्कालीन मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध आर्थिक अनियमिततेचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. व त्या प्रकरणातील अनियमितता झालेल्या रकमेतूनच हे संगणक साहित्य खरेदी करण्यात आले होते. जेंव्हा संगणकाची खरेदी करण्यात आली त्यावेळी शाळेच्या स्टॉक नोंद पुस्तीकेत या साहित्याची नोंद असून सदर संगणक शाळा सुरू नसल्याने वापरात आणल्या गेले नाही. त्या मुळे हे साहित्य लंपास करण्यामागचा हेतू कुठेतरी पूर्वग्रह दूषित दिसतो. कारण निलंबित मुख्याध्यापकाच्या पदास्थापनेला अडथळा निर्माण करण्याच्या हेतूनेच त्याच संगणक साहित्याची चोरी झाली नसावी ना, अशा एक ना अनेक शक्यतेला या घटनेमुळे वाव मिळत आहे.

वाई बाजार जिल्हा परिषद शाळेला आठव्या वर्गाच्या मान्यतेच्या निमित्ताने काही महिन्यापूर्वी राजकारणाचा आखाडा बनवण्याचा हेतू राजकीय दृष्ट्या अपयशी ठरलेल्या लोकांनी केला होता. परंतु त्यात त्यांना अपेक्षेनुसार यश मिळाले नाही. म्हणून की काय निलंबित मुख्याध्यापकाच्या पुनश्च पदास्थापनेला खोडा घालण्यासाठी हे कृत्य केले नसावे ना, अशी चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत असून शेवटी सिंदखेड पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र तिडके या प्रकरणाचा सहज छडा लावून सर्व शक्यतांना पूर्णविराम देतील अशी अपेक्षा कायदा प्रेमी नागरिकांतून वर्तविली जात आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image
go to top