नांदेड : नवउद्योजक घडणार कधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Business

नांदेड : नवउद्योजक घडणार कधी?

नांदेड : तरुण बेरोजगार युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे. कमीत कमी पैशात त्यांना लहान मोठा उद्योग - व्यवसाय करता यावा. यासाठी राज्य सरकार कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत विविध व्यवसाय, उद्योगाचे प्रशिक्षण देण्यासाठी कोर्स तयार केले आहेत. मात्र, जिल्हा उद्योग केंद्रातर्गत राबविण्यात येणाऱ्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत कोर्सचे प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन प्रशिक्षण देण्याचे प्रमाण कमी झाले असून त्या ऐवजी चार भिंतीच्या आत बसून पुस्तकी ज्ञान देण्यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. त्यामुळे जिल्हा उद्योग केंद्राच्या प्रशिक्षण कार्यक्रमातून नव उद्योजक घडणार कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

जिल्हा उद्योग केंद्रामार्फत राबविण्यात येणारे प्रशिक्षण कार्यक्रम मिटकॉन, खादी ग्रामोद्योग समिती, महाराष्‍ट्र उद्योजकता विकास केंद्रांच्या माध्यमातून तांत्रिक उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत चारचाकी वाहन दुरुस्ती, रेडीमेड गारमेंट, सुरक्षा रक्षक, ब्युटी पार्लर, आयात-निर्यात, डाटा एण्ट्री ॲपरेटर, इलेक्ट्रीक वायरमन, लाकडी फर्निचर निर्मिती, दुग्धजन्य पदार्थ हातळणी व विक्री, फळ व अन्न प्रक्रिया, दूधापासून भुकटी तयार करणे, दूधापासून लोणी, खवा, मावा, पेढा, पनीर तयार करणे, शेळी पालन, दाल मील व्यवसाय, घाणाचे खाद्य तेल निर्मिती, मधुमक्षिका पालन, मध संकलन केंद्र, बेन्टेक्स ज्वेलरी, प्रेस प्रिंटिंग व्यवसाय अशा विविध उद्योग, व्यवसायासाठी एक आठवड्यापासून ते एक ते तीन महिन्यापर्यंतचे प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी शहर व तालुक्याच्या ठिकाणच्या एखाद्या प्रशिक्षण संस्थेकडे मुलांची यादी दिली जाते. इथेही संस्थेकडून प्रात्यक्षिकापेक्षा चार भिंतीच्या आत राहून पुस्तकी ज्ञान देण्यावर अधिक भर दिला जातो. त्यामुळे मागील अनेक वर्षात जिल्ह्यात म्हणावे तसे तरुण उद्योजक घडत नसल्याची खंत ज्येष्ठ उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: राज्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

मागील अनेक वर्षापासून जिल्ह्यात शेकडो प्रशिक्षण कार्यक्रम झाले असले तरी त्यातून नाव घेता येईल असा एकही तरुण उद्योजक अथवा व्यवसायिक नावारुपाला आलेला नाही. जिल्ह्यातील अनेक लहान मोठे उद्योग, व्यवसाय बंद पडले आहेत. काही उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर असल्याचे चित्र आहे.

उद्योग, व्यवसायाला चालना द्यावी

जिल्ह्यातील उद्योग व्यवसायाची दुरवस्था बघून तरुण उद्योजक म्हणून उद्योग व्यवसाय करण्याचे धाडस करताना दिसत नाहीत. शिवाय जिल्ह्यातील उद्योग व्यवसायाला नव्याने चालना देण्यासाठी लोकप्रतिनिधीही पुढे येताना दिसत नाही. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या बेरोजगार तरुणास एक हजार रुपये मानधन व प्रमाणपत्र देऊन त्यांची बोळवण केली जाते. त्यामुळे भविष्यात तरुण उद्योजक निर्माण व्हावेत, यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा ज्येष्ठ उद्योजकांकडून व्यक्त केली जात आहे.

loading image
go to top